
रत्नागिरीत राष्ट्ररक्षण मूक पदयात्रेला हजारोंची गर्दी

रत्नागिरी : जंतर मंतरवर कॉकरोज जनता पार्टीने नीट पेपर फुटीचे कारण पुढे करून अराजक माजवणारे आंदोलन केले. त्यामध्ये हिंदू देवदेवतांबद्दल वाईट शब्द वापरले, एवढेच नव्हे तर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल चुकीचे वक्तव्य आणि देशाचे तुकडे करू अशा घोषणा दिल्या व हे आंदोलन राष्ट्रविरोधी झाले. या सर्वाचा निषेध नोंदवण्यासाठी संविधान सन्मान मंचातर्फे आज हजारोंच्या संख्येने राष्ट्ररक्षण मूक पदयात्रा काढून प्रत्युत्तर देण्यात आले. राष्ट्रहित व संविधानाचा सन्मान करणाऱ्या या जेन झी पिढीतील तरुणांनी एकीचे दर्शन घडवले. मारुती मंदिरपासून सुरू झालेल्या मूक मोर्चाची सांगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी सभेने झाली.

मूक पदयात्रेची सुरवात मारुती मंदिर येथे झाली. सकाळी १०.३० वाजल्यापासून हे युवक, युवती, जागरुक नागरिक, रत्नागिरीकर मोठ्या संख्येने येऊ लागले. प्रत्येकाच्या हाती फलक झळकत होते.

या वेळी अजिंक्य केसरकर याने सांगितले की, नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता निर्माण करणे व देशाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचविणाऱ्या कृतींच्या निषेधार्थ ही मूक पदयात्रा आयोजित करण्यात आली.
पदयात्रेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. तसेच जिल्हा रुग्णालयाजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विद्यार्थी प्रतिनिधी आणि नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जाहीर सभा झाली. यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करून जंतर मंतरवरील आंदोलन कसे भरकटले आणि राष्ट्रविरोधी शक्तींनी त्यात कशी घुसखोरी केली याचे दाखले दिले. परंतु आमची जेन झी पिढी राष्ट्राचे रक्षण करणारी आहे, आम्हाला याची जाणीव आहे, असे सांगितले.
पदयात्रेद्वारे शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने नागरिकांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. राष्ट्रहित, संविधानाचा सन्मान आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. या पदयात्रेमध्ये नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, नगरसेविका, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांच्यासमवेत लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी प्रतिक्रिया देताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले की, आज रत्नागिरीत निघालेल्या या मूक मोर्चानंतर नागरिकांनी संविधानाप्रती व देशाप्रती असलेली श्रद्धा दाखवून दिली आहे. हा केवळ राजकीय मोर्चा नसून सर्वधर्मसमभावाचा आणि सर्वसमावेशकतेचा एक भाग होता, ज्यामध्ये तरुण-तरुणी, विविध धर्मांचे लोक, वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी आणि सर्व जाती-भेद विसरून नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. संविधान मंचाच्या वतीने जिल्ह्यात काढण्यात आलेला हा मोर्चा अत्यंत भव्य व दिव्य स्वरूपाचा असून, याद्वारे दिलेला संदेश रत्नागिरीसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पातळीवर पोहोचणार आहे. संविधानात सामावलेल्या मूल्यांचा आदर करत देशातील एकता टिकवून ठेवणे हीच या मोर्चाची मुख्य भूमिका होती.

राष्ट्रहित सर्वोपरि
मूक पदयात्रेत आजचा संकल्प उद्याचा सुरक्षित भारत, राष्ट्रहित सर्वोपरि, भारत एक आहे, श्रेष्ठ आहे, आज आमचे मौन बोलेल, राष्ट्रप्रेम जग जिंकेल आदी फलक झळकत होते. एक युवक स्पायडरमॅनच्या वेषात सहभागी झाला होता त्याच्या हातात अनपेक्षित वळण म्हणजे, हा विषय कधीच नीट परीक्षेबद्दल नव्हता, असा फलक होता.




