
लोकसंवाद 2026; मतदार यादीत नाव आहे ना? वेळीच खात्री करा उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांचे आवाहन
रत्नागिरी, दि. 18 ) : लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा असून, मतदार यादी अचूक व परिपूर्ण करण्यासाठी नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने खेडचा महाराजा म्हणून प्रसिध्द असणाऱ्या खेडमधील शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद 2026’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नगराध्यक्ष माधवी बुटाला, माजी आमदार संजय कदम, उपनराध्यक्ष सतीश चिकणे, नायब तहसिलदार अमित इंगळे, जि.प. सदस्य सचिन धाडवे, मंडळाचे अध्यक्ष कुंदन सातपुते, सचिव पराग चिखले, नगरसेवक प्रेमळ चिखले, निकेतन पाटणे, मिनार चिखले, माजी नगरसेवक अजय माने, नेहा दळी, तुषार सापटे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकसंवाद 2026 या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. यानंतर उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी एसआयआर विषयी माहिती दिली.
ते म्हणाले, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) राबवण्यात आलेल्या गृहभेटींच्या पहिल्या टप्प्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रारूप यादीसोबतच मयत, अनुपस्थित, स्थलांतरित आणि दुबार नोंद असलेल्या मतदारांची वगळलेली यादी (ASD यादी) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दोन्ही याद्या मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपालिका आणि संबंधित मतदान केंद्रांवर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत; चार दिवस विशेष शिबिरे
- दावे व हरकती: प्रारूप मतदार यादीवर ३० सप्टेंबरपर्यंत हरकती अथवा दुरुस्तीचे अर्ज दाखल करता येतील.
- विशेष मोहिमेचे दिवस: १९, २०, २५ आणि २६ सप्टेंबर या चार दिवशी सर्व बीएलओ आपापल्या मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज स्वीकारतील.
आवश्यकतेनुसार भरा हे अर्ज - नमुना ६: वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांच्या नवीन नावनोंदणीसाठी.
- नमुना ७: मयत अथवा स्थलांतरित मतदारांचे नाव यादीतून वगळण्यासाठी.
- नमुना ८: नाव, वय, लिंग, पत्ता, फोटो दुरुस्ती किंवा ओळखपत्र हरवले असल्यास दुबार प्रतीसाठी.
डिजिटल युगात ऑनलाइन नोंदणीची सोय
हे अर्ज बीएलओ किंवा संबंधित शासकीय कार्यालयांत ऑफलाईन भरता येतीलच, शिवाय भारत निवडणूक आयोगाच्या ‘ECINet’ ॲप आणि सिटिझन सर्व्हिस पोर्टलद्वारे घरबसल्या ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्जासाठी आधार पडताळणी (Verification) आणि डिजिटल स्वाक्षरीसाठी ओटीपी (OTP) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
नवमतदार आणि गणेशोत्सव मंडळांवर विशेष भर
१८ ते १९ या नवमतदार वयोगटातील नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये शिबिरे आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गणेशोत्सवाचे औचित्य साधून सार्वजनिक गणेश मंडळांच्या सहकार्याने जनजागृती मोहीम आणि मतदार नोंदणीचे विशेष कॅम्प राबवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही आक्षेपाशिवाय मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदार यादीतील आपले नाव त्वरित तपासून घ्यावे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
मंडळाच्यावतीने उपनराध्यक्ष श्री. चिकणे तर प्रशासनाच्यावतीने नायब तहसिलदार श्री. इंगळे यांनी आभार मानले.
000




