खेडमध्ये बांधकामाच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

भरणे येथील सनसिटी बिल्डिंगमध्ये दुर्घटना; सुरक्षाजाळी न लावल्याने निष्काळजीपणाचा आरोप

खेड : भरणे-मंगळवार बाजार परिसरातील सनसिटी बिल्डिंगच्या बांधकामस्थळी पाचव्या मजल्यावरून पडून २९ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात १७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत कामगाराचे नाव इजहारअली हदिसमियों मन्सुरी (वय २९) असे आहे. तो सध्या सनसिटी बिल्डिंगजवळ, भरणे येथे राहत होता. मूळचा तो गोपालगंज, बिहार येथील रहिवासी असल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनसिटी बिल्डिंगच्या सी विंगमध्ये पाचव्या मजल्यावर सेंट्रींगचे काम सुरू होते. इजहारअली हा सेंट्रींगच्या बांधकामासाठी लागणारी लाकडी फळी देत असताना त्याचा अचानक तोल गेला. त्यामुळे तो लाकडी फळीसह खाली पॉडियम पार्किंगच्या स्लॅबवर पडला.

या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला, डाव्या हाताला तसेच छातीला गंभीर दुखापत झाली. या दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाला.

कामगार ज्या ठिकाणी काम करीत होता, त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली सेफ्टी नेट न लावता निष्काळजीपणा केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी गौरव वाल्मिक लांडगे (रा. चेरठ, ता. खेड) आणि सुशीत भगवान तांबे (रा. शिखली, बौद्धवाडी, ता. खेड) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब) व २३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा क्रमांक ३१३/२०२६ असून, या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button