युद्धजन्य परिस्थितीमुळे ‘उमरा’ यात्रेकरू संकटात; महाराष्ट्रातील 50 हजार मुस्लिम भाविक सौदीत अडकल्याची भीती!

मुंबई : रमजानच्या पवित्र महिन्यात ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात गेलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ५० हजार ते १ लाख मुस्लिम बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आखाती देशांमधील बिघडलेली युद्धजन्य परिस्थिती पाहता, हे भाविक तेथे अडकल्याची दाट शक्यता राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, सर्व यात्रेकरूंना सुरक्षित परत आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची सरकारकडे अधिकृत नोंद असते, मात्र उमरासाठी अशी कोणतीही केंद्रीकृत व्यवस्था नाही. बहुतांश यात्रेकरू खासगी टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्समार्फत प्रवास करतात. “राज्यातील सुमारे ५०० हून अधिक ऑपरेटर्सनी यंदा यात्रेकरूंना पाठवले असून, त्यापैकी केवळ मुंबईतूनच १०० हून अधिक ऑपरेटर्स सक्रिय आहेत. त्यामुळे अडकलेल्या भाविकांचा नेमका आकडा सोमवारपर्यंत स्पष्ट होईल,” असे प्यारे खान यांनी सांगितले.

आर्थिक अडचणींचे संकट

उमरासाठी गेलेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांतील भाविकांचा समावेश आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानांची उड्डाणे रद्द झाल्यास किंवा मुक्काम लांबल्यास या यात्रेकरूंना मोठ्या आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागू शकते. ही बाब लक्षात घेऊन भारतीय दूतावासाशी समन्वय साधला जात असून, भाविकांना तिथे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रशासकीय स्तरावर हालचाली

राज्य अल्पसंख्यांक आयोग या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून केंद्र सरकारमार्फत विशेष मदत मिळवण्याची विनंती केली जाणार आहे, असेही प्यारे खान यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि गावातून भाविक उमरासाठी जात असल्याने, ही घटना राज्यभरातील हजारो कुटुंबांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरत आहे.

कुटुंबासह खामेनींचा अंत

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या एका मोठ्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या अधिकृत ‘तसनीम’ आणि ‘फार्स’ या वृत्तसंस्थांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या भीषण हल्ल्यात केवळ अयातुल्ला अली खामेनीच नव्हे, तर त्यांची कन्या, जावई, सून आणि नात यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण इराण हादरला असून सरकारने देशात 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा आणि सात दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्यांची घोषणा केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button