
भालाफेकीचा सराव अन् हवेने दिशा बदलली! 20 वर्षांच्या विद्यार्थ्याच्या गळ्यातून भाला आरपार, आई चक्कर येऊनच पडली!
: उत्तराखंडमधील चंपावत येथे एका हृदयद्रावक घटनेत 20 वर्षांच्या पॉलिटेक्निक विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी कॉलेजच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेची तयारी सुरू असताना हा भीषण अपघात घडला. सरावाच्या दरम्यान दुसऱ्या विद्यार्थ्याने फेकलेला भाला थेट या तरुणाच्या गळ्यात शिरल्याने त्याचा जागीच जीव गेला. ऐन स्पर्धेच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
भालाफेकीच्या पट्ट्यात आला अन्…
चंपावत पॉलिटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सकाळी 8 च्या सुमारास गोरिलचौर मैदानावर गर्दी केली होती. वार्षिक क्रीडा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनेक विद्यार्थी आपापल्या खेळांचा सराव करत होते. सोमेंद्र सिंह बोहरा हा विद्यार्थी दुसऱ्या एका बाजूला फुटबॉल आणण्यासाठी गेला होता. दुर्दैवाने, तो भालाफेकीच्या पट्ट्यात आला आणि समोरून आलेल्या भाल्याने त्याच्या गळ्याचा वेध घेतला. यावेळी हवेने दिशा बदलली अन् भाला दुसऱ्याच बाजूला गेला.
आईच्या पायाखालची जमीन हादरली
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाला मानेमध्ये खोलवर शिरल्याने सोमेंद्र गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेबाबत अद्याप कोणतीही एफआयआर (FIR) नोंदवण्यात आलेली नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रुग्णालयात मुलाला पाहून आईच्या पायाखालची जमीन हादरली अन् ती चक्कर येऊन खाली पडली.
वडील गुजरातमध्ये एका कारखान्यात मजूर
सोमेंद्र हा अग्निवीर भरतीसाठी तयारी करत होता. त्याच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने नुकतीच या भरतीची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली होती. कुटुंबासाठी तो मोठा आधार होता, कारण त्याचे वडील गुजरातमध्ये एका कारखान्यात काम करतात, तर तो चंपावतमध्ये आपली आई आणि 3 बहिणींसोबत राहत होता.
सुरक्षिततेचे नियम पाळले गेले होते का?
दरम्यान, एका हुशार आणि कष्टाळू तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कॉलेज प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मैदानावर सराव सुरू असताना सुरक्षिततेचे नियम पाळले गेले होते का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.




