राजापूरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; कोतवाल रंगेहात जेरबंद, मंडळ अधिकाऱ्यालाही ताब्यात


राजापूर तालुक्यातील मिलंद तलाठी सज्जामध्ये सातबारा उताऱ्यावर नाव नोंदवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणात संबंधित मंडळ अधिकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले असून राजापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळेथर येथील ६२ वर्षीय महिलेने वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पतीचे नाव दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. या कामासाठी मंडळ अधिकारी पूनम जयसिंग गावित (वय ३७) यांनी कोतवाल संजना नंदकुमार माने (वय ४१) यांच्या माध्यमातून सुरुवातीला २५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

तक्रारीची १४ मे २०२६ रोजी शासकीय पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तडजोडीनंतर २० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर त्याच दिवशी सापळा रचण्यात आला. तक्रारदार महिलेने मिलंद येथील तलाठी कार्यालयात जाऊन कोतवाल संजना माने यांच्याकडे २० हजार रुपयांची लाचेची रक्कम दिली. माने यांनी पंचांसमक्ष ती स्वीकारल्यानंतर मंडळ अधिकारी पूनम गावित यांना फोन करून रक्कम स्वीकारल्याची माहिती दिली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सायंकाळी साडेचार वाजता संजना माने यांना रंगेहात पकडले, तर पूनम गावित यांना राजापूर येथून ताब्यात घेण्यात आले.

कारवाईदरम्यान दोन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांच्या राहत्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन्ही आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांनी या कारवाईचे पर्यवेक्षण केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button