चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील उपनिरीक्षकाच्या सहकाऱ्याला १५ हजारांची लाच घेतानालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले


  • चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरून लाच स्वीकारत असताना त्यांच्या सहकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

सावर्डे पोलीस स्टेशन येथे मयताच्या वारसदारांना विमा रक्कम मिळविण्यासाठी क्लेम ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल करावयाचा होता. त्यासाठी अपघातातील वाहनाचा आरटीओ तपासणी अहवाल व डीओआर फॉर्म देण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक मनिष कांबळे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली.

तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता, तडजोडीअंती १५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरले. ही लाच रक्कम थेट न घेता, खाजगी इसम अभिजित प्रकाश शिर्के (रा. चिपळूण) याच्यामार्फत स्वीकारण्याचे मनिष कांबळे यांनी तक्रारदाराला फोनद्वारे सांगितले.

त्यानुसार तक्रारदार चिपळूण पोलीस स्टेशनजवळील सोमेश्वर जनरल स्टोअर्स या दुकानात गेला. तेथे अभिजित शिर्के यांनी फोनद्वारे मनिष कांबळे यांच्याशी संपर्क साधला. दोघांमध्ये संभाषण झाल्यानंतर शिर्के यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. सदर लाच रक्कम लोकसेवकाच्या सांगण्यावरून व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने खाजगी इसम अभिजित शिर्के याला पंचांसमक्ष लाच रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे व त्यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button