
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला सौ .शोभना वसंत केळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार घोषित.
महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय असणाऱ्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला सौ. शोभना वसंत केळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार घोषित झाला आहे. विले पार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जेष्ठ शास्त्रीय गायिका आशाताई खाडीलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.
स्वा. सावरकरांच्या ६० व्या आत्मार्पण दिना निमित्ताने अटलसेवा केंद्र मुंबई यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे औचित्य साधत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २१ हजार रुपये आणि सन्मान असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय दीर्घ काळ वाचनसंस्कृती जतन करत आहे १८ २८ साली नेटिव्ह लायब्ररी नावाने स्थापन झालेल हे वाचनालय २०० वर्षांच्या उंबरठ्यावर डौलाने उभे असून १ लाख १५ हजारांची ग्रंथ संपदा या वाचनालयाचे वैभव आहे. दुर्मिळ पुस्तकांचे माहेरघर म्हणून हे वाचनालय प्रसिद्ध आहे. बहुविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने आयोजित करणारे सर्वात जुने मात्र अद्ययावत वाचनालय म्हणून हे वाचनालय ओळखले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या रत्नागिरीतील वास्तव्या दरम्यान जुने नाव बदलून या वाचनालयाला रत्नागिरी नगर वाचनालय हे नाव दिले होते.
अश्या नामांकित वाचनालयाला सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर करताना मनस्वी आनंद होतो असे अटल सेवा केंद्राचे प्रवर्तक सुनील मोने यांनी सांगितले.
सौ शोभना वसंत केळकर यांनी केलेलं सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे त्यांच्या सामाजिक कार्यातून समाजाला सातत्याने प्रेरणा मिळत रहावी या हेतूने त्यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने दर वर्षी हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचे हे चवथे वर्ष आहे अशी माहिती श्री. सुनील मोने यांनी दिली.




