
मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! दारात बसलेला माणूस फेकला गेला, चार जण गंभीर जखमी
मुंबईतील सांताक्रुझ येथे एका घरात गॅस दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक झालेल्या स्फोटामुळे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरूवारी सायंकाळी ही घटना घडली. या शक्तिशाली स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांनाही हादरे बसले. या भीषण स्फोटाचे सीसीटीव्ही चित्रण आता व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ पूर्व येथील गावडे यांच्या घरात गॅस स्टोव्हच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक सिलिंडरचा स्फोट झाला आणि घरात आगीचा भडका उडाला. हा स्फोट इतका तीव्र होता की, शेजारच्या घरांनाही त्याचे हादरे बसले. शेजाऱ्यांच्या घराबाहेर बसलेला एक वृद्ध व्यक्ती स्फोटाच्या तीव्रतेमुळे बाजूला फेकला गेला. सदर वृद्धाला किरकोळ जखम झाली.
या दुर्घटनेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात स्फोटाची तीव्रता दिसून येत आहे. स्फोटामुळे सुमती रमेश गावडे (६५), अवंतिका अजय गावडे (४५), यश गावडे (१०) आणि गॅस दुरूस्ती करण्यासाठी आलेला जावेद अब्दुल शेख (३०) हे चारजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थली धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
गॅस दुरूस्तीच्या कामादरम्यान काही चूक झाली का? किंवा गॅस सिलिंडर हाताळण्यात काही त्रुटी राहिल्या का? याचा तपास केला जात आहे.



