खेड येथे गावठी बॉम्ब बाळगणारा एकजण ताब्यात७० जिवंत गावठी बॉम्ब जप्त : रत्नागिरी पोलिसांची कारवाई


स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेड उपविभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना खेड-मंडणगड रस्त्यावर मौजे मुगीज येथे २८ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास संशयास्पद हालचाली करणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आले. प्रकाश राम जगताप (वय ३३, रा. शिरखल, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे त्याचे नाव असून, त्याच्या ताब्यातून बेकायदेशीररीत्या स्फोटक पदार्थ सदृश ७० जिवंत गावठी बॉम्ब तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण २ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर स्फोटक पदार्थाविरोधात प्रतिबंध व कारवाई करण्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
प्रकाश जगताप याला तत्काळ ताब्यात घेऊन दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५/२०२६ भारतीय स्फोटक कायदा १९०८ कलम ५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच बेकायदेशीर स्फोटक पदार्थाविरोधात कठोर पावले उचलण्यात येत असून, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा डायल ११२ या संपर्क क्रमांकावर कळवावी, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.

ही, कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, दीपराज पाटील, सत्यजित दरेकर, चालक अतुल कांबळे यांनी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button