
सहेली ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ. सुनीता राजेश साळवी यांचा हिट अँड रन अपघातात दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी शहरात रविवारी संध्याकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. शहरातील प्रसिद्ध सहेली ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ. सुनीता राजेश साळवी (वय अंदाजे ५५) यांचा हिट अँड रन अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसरात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. सुनीता साळवी या रस्त्यावरून जात असताना मागून येणाऱ्या गाडीने त्यांना ठोकर दिली त्यामुळे त्या रस्त्यावर पडलेले असताना असताना होंडा सिटी चारचाकी वाहन चालकाने त्यांच्या अंगावरून गाडी नेली. अपघातानंतर वाहनचालकाने थांबण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढल्याने हा प्रकार हिट अँड रन स्वरूपाचा ठरला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात राजीवडा येथील युवकाविरोधात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांना घटनेबाबत अवगत करण्यात आले. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना दिले आहेत. पोलीस तपास वेगाने सुरू असून संबंधित वाहन व चालकाचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा असल्याची तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. रस्त्यावर पडलेल्या एका महिलेच्या अंगावरून गाडी नेण्याइतका निर्दयी प्रकार कसा घडू शकतो, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
सौ. सुनीता साळवी या गेली सुमारे ३० वर्षे रत्नागिरी शहरात ब्युटी पार्लर व्यवसायात कार्यरत होत्या. त्या रत्नागिरीतील पहिल्या ब्युटी पार्लर व्यावसायिकांपैकी एक मानल्या जात. शहरात त्यांचे दोन पार्लर होते आणि त्या त्यांच्या कामासाठी अत्यंत लोकप्रिय होत्या.
त्यांच्या अचानक आणि दुर्दैवी मृत्यूमुळे रत्नागिरी शहरात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातू आणि मुलगी असा परिवार आहे.




