
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई( रिंगणे, कोंडगे, कुरंग, झर्ये,आरगाव व झर्ये ग्रामस्थ)आयोजित११ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, रिंगणे
गत दशकभरात स्वतःची वेगळी ओळख जपत कोकणातील ग्रामीण साहित्याची चळवळ नव्याने बांधण्यासाठी पुढाकार घेतलेल्या, सामाजिक बांधिलकीचे अधिष्ठान असलेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबईच्या अनुज्ञेनं यावर्षीचेअकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान सह्याद्रीचा पायथ्याशी वसलेल्या लांजा तालुक्यातील निसर्गरम्य रिंगणे गावाला मिळाला आहे. ७२ वर्षापूर्वी मुंबईत दादरच्या कोतवाल उद्यानात राजापूर लांजा तालुक्यातील चाकरमान्यांनी आपल्या मायभूमी च्या सर्वांगिण विकासाचं स्वप्नं साकार करण्यासाठी सन १९५३ मध्ये राजापूर लांजा तालुका नागरिक संघाची मुहर्तमेढ रोवली. त्यावेळी संघाची स्थापना करण्यात रिंगणे गावच्या दूरदृष्टी असलेल्या सुपूत्रांचा विशेष पुढाकार होता. १९६० ते १९९० च्या साडे तीन दशकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेस वसलेल्या लांजा – राजापूर या दोन तालुक्यांमध्ये पक्के रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, कृषी क्षेत्रातील सुधारणा अशा मूलभूत प्रश्नांकरिता सरकार दरबारी कैफीयत मांडणारी व त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणारी संस्था म्हणून संघाने नावलौकीक मिळविला. पुढे संघाने एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी बदलत्या समाज जीवना बरोबर नवीन समस्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करित असताना नव्या पिढीला आवश्यक असणारे उपक्रम राबवायला सुरवात केली. त्यामध्ये प्रामुख्याने १० वी,१२ वी च्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी बक्षीस योजना, तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन शिबिरे, शैक्षणिक साहित्याचे वाटप,समाज हितासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचे यथोचित गौरव सोहळे, तसेच आपल्या भागातील साहित्याची आवड असणाऱ्यांसाठी,नवोदित साहित्यिकांसाठी व्यासपीठ मिळवून देणारे ग्रामीण साहित्य संमेलन भरवणे या उपक्रमांचा समावेश आहे. हे स्तूत्य उपक्रम राबवित असताना संघाला स्थानिक पातळीवर क्रियाशील कार्यकर्ते भेटत केले परिणामी संघाच्या उपक्रमांना अधिक यशस्वीता मिळाली. आज राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई ही संस्था आपल्या रचनात्मक कार्याने राजापूर लांजा तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचली आहे.
संघाच्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे हे अकरावे वर्ष असून या संमेलनाचा कार्यक्रम लांजा तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या,ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या निसर्गसंपन्न ‘रिंगणे’ या गावी दिनांक ३० जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.लांजा शहरापासून ३० कि.मी.अंतरावर नावेरीच्या काठावर दुतर्फा वसलेले रिंगणे पूर्वीपासूनच तालुक्यातील प्रगतशील गाव म्हणून ओळख टिकून आहे सह्याद्रीच्या वर्तुळाकृती डोंगररांगांनी तयार झालेल्या रिंगणात गाव वसल्याने या गावाला ‘रिंगणे’असे सार्थ नाव पडले.लांजा तालुक्याच्या पूर्व विभागात वसलेली झर्ये, कुरंग,कोंडगे,रिंगणे, गावाला नावेरी परिसर म्हणून संबोधले जाते. सोबत आरगाव,व्हेळ ही गाडीरस्त्यामुळे या परिसराला जोडली गेली आहेत.परिसराच्या केंद्रस्थानी रिंगणे असून ग्रामदैवत श्री केदारलिंगाचे कृपाछत्र लाभलेले रिंगणे दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे. मराठी कामगार रंगभूमीवरील सशक्त नाटककार लाडकोजी कृष्णाजी आयरे याच रिंगणे गावचे सुपुत्र.या गावाला शतकोत्तरी नाट्य परंपरा लाभली असून या गावचे कर्तुत्वान सुपुत्र अनेक ठिकाणी उच्च पद भूषवित असून विविध क्षेत्रात त्यांनी आपली नाममुद्रा उमटवली आहे.रिंगणे परिसरात नव्याने उभारलेले श्री.केदारलिंग मंदिर, डोलारखिंड,नावाकडा,कोंडगे धरण, कुरंग येथील आसरा कोंड व सह्यादीतील ऐतिहासिक पाजा या प्रमुख पर्यटन स्थळांसह बारमाही खळखळ वाहणारी जीवनदायी नावेरी, तिच्या काठावरील आकर्षक पद्धतीने बांधलेली विविध ग्रामदैवतांची मंदिरे व विहार,कोकणी टुमदार वाड्यावस्त्या हे सर्व अस्सल कोकणी समृद्ध जीवन आवर्जून पाहण्यासारखे आहे. या सोबतच सतीशिळा वीरगळ,भडकंबा, घरवंद यांसारखे ऐतिहासिक अवशेष ही गावात पाहायला मिळतात. या संमेलनाच्या निमित्ताने रिंगणे परिसरातील समृद्ध इतिहास, निसर्ग,संस्कृती,लोककलांना नव्याने उजाळा मिळणार आहे.
या साहित्य संमेलनाच्या नाटककार ला.कृ.आयरे साहित्य नगरीत प्रसिद्ध साहित्यिक इतिहासकारांचे विचार ऐकण्याची संधी मिळेल. तसेच आपल्याकडील नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम होणार आहे.क्रांतीज्योत,ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, व्याख्याने,काव्य संमेलन,सांस्कृतिक कार्यक्रम, विविध पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम असलेले हे ग्रामीण मरनि साहित्य संमेलन जितके अधिक उठावदार होईल तेवढेच रिंगणे गाव व परिसर अधिक प्रकाशात येईल. यासाठी संघाचे मुंबईचे व स्थानिक कार्यकर्ते तसेच रिंगणे व परिसरातील गावातील ग्रामस्थ ही मेहनत घेत आहेत.
या कार्यक्रमात साहित्यिक, कलाकार व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. असे आयोजकांकडून आवाहन करण्यात येत आहे.
संमेलनाची वैशिष्ट्ये
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
माननीय श्री कुमार केतकर
ज्येष्ठ पत्रकार व माजी संपादक लोकसत्ता
कोकण भूषण पुरस्काराचे मानकरी
मालवण मधील वराड गावचे प्रभाकर वाईरकर
आंतरराष्ट्रीय किर्तीचे व्यंगचित्रकार
आंतरराष्ट्रीय कृतीचे सतार वादक विदुर महाजन यांचे सतार वादन व मुलाखत
यशवंत माणके यांच्या ‘चौथरा’ या नाटकाचा प्रयोग
शालेय विद्यार्थ्यांच्या एकांकिका
*प्रदर्शने
१)चित्रकार विजयराज बोधनकर यांचे चित्र प्रदर्शन
२) व्यंगचित्रकार प्रभाकर वाईकर यांचे चित्र प्रदर्शन
३) निकेत पावसकर
४)सुनील कदम यांचे शस्त्र प्रदर्शन
५)महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाचे
पुस्तक प्रदर्शन
६) मुलांचे चित्र प्रदर्शन
७) रांगोळी प्रदर्शन
८) पाककला प्रदर्शन
९) दिवाळी अंक प्रदर्शन
*“”
संमेलन कार्यक्रम पत्रिका
कोंडगे,कुरंग गावातील नदी जलपूजन
क्रांती ज्योत – रविवार २६ जानेवारी
संमेलन पूर्व कार्यक्रम
शुक्रवार,३० जानेवारी
सकाळी ८ ते १० रांगोळी प्रदर्शन
१० ते १२. पाककला स्पर्धा
संमेलन पूर्व संध्येचे कार्यक्रम
संध्या.५ ते ७ . नदी जलपूजन रिंगणे,नावेरी नदी
रात्रौ ८ ते ११ नाटक चौथरा
११ ते १२ रंगमंच सजावट
शनिवार,३१ जानेवारी
सकाळी ८ते ९ ग्रंथदिंडी
१० ते १.२० वा. उद्घाटन,
स्मरणिका, पुस्तके प्रकाशन
१२.२० ते १.२० संमेलनाध्यक्षांचे भाषण
प्रथम सत्र समाप्त
२.०० ते ३.०० मुलांच्या एकांकिका
३.०० ते ४.०० मुलांचे कथाकथन व भाषणे
दुसरे सत्र समाप्त
व्याख्याने व परिसंवाद
४ ते ५. – मराठी भाषा आणि तिचा इतिहास
वक्ते श्री.कृष्णाजी कुलकर्णी
५ ते ६ परिसंवाद -कोकण संस्कृती
सहभाग १) डॉ. निधी पटवर्धन , २ डॉ पार्थ काळे,
३ ऋषीकांत राऊत , ४ रामदास खरे
६ ते ७ शिवचरित्र सचिन कर्डे
तृतीय सत्र समाप्त
७.३० ते ८.३० स्थानिक कवी संमेलन -अध्यक्ष- प्रकाश होळकर (उपाध्यक्ष -कुसुमाग्रज प्रतिष्ठान )
८.३० ते ९.३० निमंत्रितांचे काव्य संमेलन
चतुर्थ सत्र समाप्त
१० ते ११.३०
विदुर महाजन यांचे सतार वादन व मुलाखत
- संवादक दिनेश मोरे
पाचवे सत्र समाप्त
रविवार,१ फेब्रुवारी
दुसरा दिवस
सकाळी ९ वा. –
उद्घाटन समारंभ
मुलांच्या एकांकिका / फॅशन शो कार्यक्रम
पुरस्कार विजेत्यांचे आगमन
९० पार ज्येष्ठांचा सन्मान
प्रभाकर वाईरकर मुलाखत
कोकण भूषण पुरस्कार वितरण
जीवन गौरव पुरस्कार वितरण
स्पर्धा बक्षीस वितरण (रांगोळी स्पर्धा,पाककला स्पर्धा)
इतर पुरस्कार वितरण
नववधू सन्मान
मोफत दंत चिकित्सा सौजन्य डॉ सायली दळवी आयरे
मोफत नेत्र चिकित्सा -सौजन्य इंन्फिगो, रत्नागिरी
पुरस्कार वितरण सोहळा सुरुवात २०१४
ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात २०१५
संमेलने जिथे झाली ती गावे व त्यांचे अध्यक्ष
१) २०१५ तळवडे-लांजा, अध्यक्ष -ॲड.विलास कुवळेकर
२) २०१६ पाचल-राजापूर, अध्यक्ष -राजाराम खाडे
३) २०१७ -लांजा, अध्यक्ष – सुरेश खटावकर
४) २०१८- ताम्हाणे-राजापूर, अध्यक्ष -नाटककार दशरथ राणे
५) २०१९- कोट -लांजा, अध्यक्ष -गजाभाऊ वाघदरे
६) २०२०- नाटे -राजापूर, अध्यक्ष -गंगाराम गवाणकर
७) २०२२ प्रभानवल्ली-लांजा, अध्यक्ष -अशोक लोटणकर
८) २०२३ तळवडे-राजापूर, अध्यक्ष -चंद्रकांत देशपांडे
९) २०२४ शिपोशी-लांजा, अध्यक्ष -विजय कुवळेकर
१०) २०२५ वाटुळ-राजापूर, अध्यक्ष -दिनकर गांगल
११) २०२६ रिंगणे-लांजा, अध्यक्ष – कुमार केतकर




