बनावट औषधांचा सुळसुळाट? ‘कामराज कॅप्सूल’मध्ये आढळले घातक लैंगिक उत्तेजक; तुकाराम मुंढेंसमोर मोठे आवाहन!

नागपूर : आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली लैंगिक उत्तेजक आणि वेदनाशामक औषधे मिसळल्याचा प्रकार एका प्रकरणात उघड झाला, तर दुसरीकडे शस्त्रक्रियेनंतर वापरल्या जाणाऱ्या ‘चायमोरल फोर्टे’च्या बनावट साठ्याची विक्री झाल्याचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे नागपूरसह देशभरातील बनावट औषधांच्या जाळ्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापुढे बनावट औषधांवर नियंत्रणाचे मोठे आवाहन आहे.

नेमके कोणते दोन प्रकार उघडकीस आले आहेत?

‘कामराज कॅप्सूल’ या आयुर्वेदिक औषधाचा नमुना बनावट आणि निकृष्ट दर्जाचा असल्याचे आढळले आहे. तसेच ‘चायमोरल फोर्टे’ या औषधाच्या बनावट साठ्याची विक्री झाल्याचेही तपासात समोर आले आहे.

‘कामराज कॅप्सूल’ प्रकरणात काय आढळले?

प्रयोगशाळेतील तपासणीत या कॅप्सूलमध्ये पुरुषांच्या लैंगिक समस्यांवरील उपचारासाठी वापरले जाणारे ‘टॅडालाफिल’ आणि वेदनाशामक ‘पॅरासिटामॉल’ हे अ‍ॅलोपॅथिक औषधी घटक मिसळल्याचे आढळले. आयुर्वेदिक औषध म्हणून त्याची विक्री केली जात होती.

या प्रकरणाचा उलगडा कसा झाला?

अन्न व औषध प्रशासनाने जुलै २०२५ मध्ये गंजीपेठ येथील एका औषध आस्थापनाची तपासणी केली. पॅकिंगवरील माहितीमध्ये विसंगती आढळल्याने नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर शासकीय विश्लेषकांनी ते औषध बनावट व निकृष्ट दर्जाचे असल्याचे घोषित केले.

उत्पादक कंपनीने काय भूमिका घेतली?

पॅकिंगवर नमूद असलेल्या पंजाबमधील कंपनीने संबंधित औषध आपले नसल्याचे लेखी स्वरूपात स्पष्ट केले. त्यामुळे बनावट उत्पादनाचा संशय अधिक बळावला.

‘चायमोरल फोर्टे’ प्रकरणात काय आढळले?

शस्त्रक्रियेनंतरची सूज आणि दाह कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘चायमोरल फोर्टे’ या औषधाच्या बनावट बॅचची विक्री झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या औषधावर नामांकित उत्पादक कंपनीचे नाव वापरण्यात आले होते.

या प्रकरणात किती जणांवर कारवाई झाली?

नागपूरसह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील एकूण बारा औषध विक्रेते व वितरकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिस कारवाई झाली आहे का?

‘कामराज कॅप्सूल’ प्रकरणी गणेशपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ‘चायमोरल फोर्टे’ प्रकरणात अठरा जून २०२६ रोजी प्रथम माहिती अहवाल नोंदविण्यात आला.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

अन्न व औषध प्रशासनाने औषधे केवळ अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. औषधावरील बॅच क्रमांक, उत्पादन व मुदत समाप्ती दिनांक तपासावा. संशयास्पद औषधांची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रकरणांमुळे कोणती चिंता वाढली आहे?

उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये बनावट किंवा अनधिकृत घटक आढळणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. नागपुरात उघडकीस आलेल्या या दोन प्रकरणांमुळे देशभरातील औषध वितरण साखळीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यातील नागरिकांना या बनावट औषधांपासून वाचवण्याचे अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button