गरजू महिलेला मदतीचा हात पुढे करणाऱ्याचा गैरफायदा;संभाषण व्हायरल करण्याची धमकी देत १७ लाखांची खंडणी, चौघांना अटक*


रत्नागिरी : एका गरजू महिलेला मदतीचा हात पुढे करणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील उमरे येथील ५२ वर्षीय व्यक्तीला संभाषणाची ध्वनिमुद्रिका नातेवाईक आणि मित्रमंडळींना ऐकवून बदनामी करण्याची धमकी देत तब्बल १७ लाख ९ हजार ४९४ रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी एका महिलेसह चौघांना अटक केली आहे.

रामचंद्र चिंतामणी केळकर (वय ५२, रा. उमरे, ता. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शहर पोलिसांनी सुरैय्या हकीम, हुसैन नाईक, अंजर हकीम आणि अरफान हकीम (सर्व रा. रत्नागिरी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५), ३०८(२) व ३०८(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जुलै २०२५ ते मे २०२६ या कालावधीत घडला. तक्रारदार केळकर हे आपल्या भावाला भेटण्यासाठी शहरातील एका रुग्णालयात गेले असता त्यांना सुरैय्या हकीम ही महिला रडताना दिसली. मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक अडचण असल्याचे सांगत तिने मदतीची विनंती केली. त्यानंतर केळकर यांनी तिला रोख रक्कम तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारे आर्थिक मदत केली.

मात्र, दुसऱ्याच दिवशी सुरैय्याच्या मोबाईलवरून एका व्यक्तीने केळकर यांच्याशी संपर्क साधून त्यांचे आणि महिलेचे संभाषण रेकॉर्ड केल्याचा दावा केला. हे संभाषण नातेवाईक आणि मित्रपरिवारात प्रसारित करण्याची धमकी देत सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. बदनामीच्या भीतीने केळकर यांनी ही रक्कम पाठवली.

यानंतर आरोपींनी वारंवार फोन करून संभाषण व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी सुरूच ठेवली. सततच्या मानसिक दबावामुळे केळकर यांनी विविध ऑनलाइन व्यवहारांद्वारे एकूण १७ लाखांहून अधिक रक्कम आरोपींना दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अखेर या ब्लॅकमेलिंगला कंटाळून केळकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांना अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button