
पक्षाच्या वर्धापन दिनी शिवसैनिकांनी जपली सामाजिक बांधिलकी; रत्नागिरीत रक्ताच्या तुटवड्यावेळी धावून येत रुग्णांना दिले जीवदान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आज राज्यभरात वर्धापन दिन उत्साहात साजरा होत असताना, रत्नागिरीतील शिवसैनिकांनी मात्र रक्ताच्या तुटवड्यामुळे मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी धावून जात पक्षाची '८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण' ही शिकवण प्रत्यक्षात आणली आहे. ऐन वर्धापन दिनी केलेल्या या तातडीच्या रक्तदानामुळे दोन गंभीर रुग्णांचे प्राण वाचले आहेत.रक्तपेढीतील तुटवड्यामुळे नातेवाईकांची उडाली होती धावपळ
परकार हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी (ऑपरेशन) ‘B+’ (बी पॉझिटिव्ह) रक्तगटाची अत्यंत निकड होती. मात्र, रत्नागिरीच्या ब्लड बँकेत ‘B+’ रक्ताचा साठा उपलब्ध नसल्याचे समोर आल्याने नातेवाईकांची मोठी धावपळ उडाली. यातच चिंतामणी हॉस्पिटलमधूनही एका रुग्णासाठी ‘B+’ रक्ताची तातडीची मागणी आली. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांतून आलेल्या या फोनमुळे आणि अनेक नियमित रक्तदाते रत्नागिरी बाहेर (Out of Ratnagiri) असल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
जॉब संपवून शाखाप्रमुख थेट ब्लड बँकेत हजर
पक्षाच्या वर्धापन दिनाचा उत्साह बाजूला ठेवत, रुग्णांची ही गंभीर परिस्थिती समजताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे काळबादेवी गावचे शाखाप्रमुख अजिंक्य आदेश सुर्वे हे देवदूतासारखे धावून आले. परकार हॉस्पिटलमधील रुग्णाची गरज पाहता, अजिंक्य सुर्वे यांनी आपल्या नोकरीची वेळ संपताच थेट शासकीय रुग्णालय (जिल्हा रुग्णालय) गाठले आणि तातडीने रक्तदान करून रुग्णाला जीवदान दिले.
तालुका कार्यालयाच्या आवाहनाला शिवसैनिकांचा तातडीने प्रतिसाद
दुसऱ्या बाजूला, चिंतामणी हॉस्पिटलमधील रुग्णाची अडचण दूर करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या रत्नागिरी तालुका कार्यालयातून सोशल मीडियाद्वारे तात्काळ आवाहन करण्यात आले. पक्षाच्या वर्धापन दिनी समाजकारणाचा हा संदेश मिळताच ‘B+’ रक्तगटाचे दोन तरुण शिवसैनिक काही मिनिटांतच ब्लड बँकेत हजर झाले आणि त्यांनीही रक्तदान केले.
वर्धापन दिनाचे कोणतेही जाहीर सोहळे किंवा गाजावाजा न करता, ऐन संकटाच्या वेळी रक्ताचा तुटवडा भरून काढत शिवसैनिकांनी दाखवलेल्या या तत्परतेचे रत्नागिरीकरांकडून कौतुक होत आहे.




