
गणपतीपुळ्यात सतत घडत आहे दुर्घटना,गणपतीपुळे समुद्रकिनारी दुर्घटना; संभाजीनगरचे ५ पर्यटक समुद्रात बुडाले, शोधकार्य सुरू
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे हे दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गटातील पाच जण समुद्रात बुडाल्याची घटना घडली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासन आणि जीवरक्षकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास या गटातील काही सदस्य समुद्रात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा वेग आणि लाटांचा अंदाज न आल्याने पाच जण खोल पाण्यात ओढले गेले.
घटनेची माहिती मिळताच किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी तसेच तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, समुद्रात सध्या पाण्याचा प्रबळ प्रवाह (करंट) असल्याने शोधमोहिमेला अडचणी येत आहेत. तरीही स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बोटींच्या सहाय्याने बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे.




