
रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८५ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध; पशुपालकांमध्ये समाधान
रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा काही तालुके वगळता इतर भागात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने ट्रिगर १ (पहिली कळ) मध्ये तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे १ लाख ९६ हजार लहान-मोठ्या जनावरांच्या चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने युद्धपातळीवर नियोजन केले आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात तब्बल ८५ हजार ७१० मेट्रिक टन चारा उपलब्ध असून, मुबलक चारा आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे स्थानिक पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असताना, दुसरीकडे पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार नऊही तालुक्यांत अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पंचनामे करत आहेत.
संभाव्य दुष्काळात जनावरांचे हाल होऊ नयेत म्हणून चारा-पाण्याची व्यवस्था चोख ठेवावी आणि आवश्यक पडल्यास चारा छावण्या उभारण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डोंगराळ भाग, खरीप पिके आणि विशेष चारा पिकांच्या माध्यमातून जनावरांसाठी आवश्यक साठा तयार ठेवण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाने पूर्वी शेतकऱ्यांना केलेल्या चारा बियाणे वाटपामुळेही या साठ्यात भर पडली आहे. चारा उत्पादनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) ३० लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीचा प्रस्ताव पाठवला असून, या निधीच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे; हा निधी उपलब्ध झाल्यास बियाणे वाटपाद्वारे शेतकऱ्यांना आणखी मोठी मदत करणे शक्य होणार आहे.




