पानवल धरण नुतनीकरणाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण; रत्नागिरीकरांना आता मिळणार साडेसात एमएलडी पाणी


​रत्नागिरी, दि. २० )- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या पानवल धरणाच्या मजबुतीकरण आणि नुतनीकरण कामाचे लोकार्पण आज पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण करून दिमाखात संपन्न झाले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) विशेष स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. या धरणातून आतापर्यंत केवळ २ एमएलडी (दशलक्ष लिटर्स) होत असलेला पाणीपुरवठा आता साडेसात एमएलडी इतका वाढणार आहे. हा आपल्यासाठी एक ऐतिहासिक क्षण असल्याची भावना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.
​या सोहळ्याला आमदार किरण सामंत, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, जि. प. सदस्य बाबू म्हाप, मुख्याधिकारी वैभव गारवे, कार्यकारी अभियंता विजय पाटील तसेच नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
​वीज बील व खर्चात मोठी बचत; पर्यटनालाही मिळणार चालना
​यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, १९६२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते या धरणाचे भूमिपूजन झाले होते आणि १९६५ मध्ये ते पूर्ण झाले. त्यानंतर आज इतक्या वर्षांनी या धरणाच्या नुतनीकरणाची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. पानवल धरणातून रत्नागिरी शहरात थेट ‘ग्रॅव्हीटी’ने (गुरुत्वाकर्षणाने) पाणीपुरवठा होणार असल्यामुळे पंपिंग मशिनरीचा वापर टळेल. परिणामी, विजेचा व देखभालीचा मोठा खर्च वाचणार आहे.
​धरण प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानत पालकमंत्री म्हणाले, भविष्यात या धरणाचा उपयोग पर्यटनासाठी केला जाईल. रत्नागिरी मतदारसंघातील पहिला ‘वॉटर स्पोर्ट्स’चा प्रयोग पानवल धरणात करण्यात येणार असून, त्या दृष्टीने आवश्यक पाण्याचा साठा आणि उंची तपासून एका वर्षात पर्यटन आराखडा तयार केला जाईल. यासाठी आवश्यक असणारा सर्व निधी पालकमंत्री म्हणून उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच, स्थानिक नागरिकांना या पर्यटनामध्ये रोजगाराचे प्राधान्य दिले जाईल आणि गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण पुढील शिमगोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी नगरपालिकेला दिले.
​पानवल भागाला धबधब्याचा मोठा नैसर्गिक वारसा लाभला असून येथील धबधबा सुरक्षित आहे, असे नमूद करत पालकमंत्र्यांनी पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. काही पर्यटक अतिउत्साहापोटी किंवा चुकीच्या पद्धतीने धाडस करून आपला जीव धोक्यात घालतात. अशा दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन खबरदारी घ्यावी व पर्यटकांवर लक्ष ठेवावे, अशी सूचनाही त्यांनी शेवटी केली.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक नगराध्यक्ष श्रीमती सुर्वे यांनी तर मुख्याधिकारी श्री. गारवे यांनी आभार मानले.
​’सिंचन भवन’ आणि ‘शासकीय विश्रामगृहाच्या’ नुतनीकृत इमारतींचे उद्घाटन
​पानवल धरणाच्या लोकार्पणासोबतच आज पालकमंत्र्यांच्या हस्ते रत्नागिरीतील इतर दोन महत्त्वाच्या नुतनीकृत शासकीय इमारतींचेही उद्घाटन करण्यात आले. पाटबंधारे विभागाच्या नुतनीकरण केलेल्या सिंचन भवन इमारतीचे उद्घाटन डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
यावेळी कार्यकारी अभियंता विजय पाटील, कार्यकारी अभियंता डी.बी. जाधव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नुतनीकृत शासकीय विश्रामगृह इमारतीचे उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आमदार किरण सामंत, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर उपस्थित होते. उद्घाटनानंतर पालकमंत्र्यांनी नुतनीकरण केलेल्या कक्षांची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button