रत्नागिरीत श्री सत्यसाई सेवा समिती व शासकीय तंत्रनिकेतनच्या ॲल्युम्नि असोसिएशनतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग

​रत्नागिरी : मानवी जीवनाचे रक्षण करणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणाऱ्या ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उदात्त विचाराला अनुसरून, जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून श्री सत्यसाई सेवा समिती, रत्नागिरी आणि ॲल्युम्नि असोसिएशन ऑफ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य व प्रेरणादायी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा समाजोपयोगी उपक्रम गुरूवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी औषधशास्त्र निर्माण विभाग, शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथील प्रांगणात सकाळी १० ते दुपारी २ या निर्धारीत वेळेत पार पडला.
​वैद्यकीय उपचारार्थ रक्ताची वाढती गरज लक्षात घेता, आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही रुग्णाला रक्ताविना प्राण गमवावे लागू नये, तसेच युवकांमध्ये व नागरिकांमध्ये आरोग्याविषयी व निस्वार्थ समाजसेवेविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या प्रमुख उद्देशाने या शिबिराची आखणी करण्यात आली होती. या उपक्रमाला रत्नागिरी परिसरातुन अत्यंत उदंड व सकारात्मक प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.
​या विशेष शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे, शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीचे प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, सर्व, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तंत्रनिकेतनचे आजी-माजी विद्यार्थी तसेच परिसरातील जागरूक नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. महाविद्यालयीन प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी व शिक्षकांनी स्वतः पुढे येऊन रक्तदान केल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर एक उत्तम सामाजिक आदर्श निर्माण झाला.
​रक्तदानासारख्या अत्यंत पवित्र, मानवीय आणि जीवनदायी कार्यात स्वतःहून सहभाग घेऊन अनेकांचे प्राण वाचवण्याच्या या यज्ञामध्ये योगदान दिल्याबद्दल उपस्थित सर्व रक्तदात्यांचे आयोजकांतर्फे आभार मानण्यात आले व सत्कार करण्यात आला. तसेच, श्री सत्यसाई सेवा समिती व ॲल्युम्नि असोसिएशनच्या वतीने अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविले जातील, असा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी व सुयोग्य व्यवस्थापनासाठी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, समन्वयक, तसेच स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button