
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, ‘जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर’
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके हे दिल्लीतील जंतर-मंतरवर होणाऱ्या आंदोलनासाठी आज दिल्लीला (Delhi) रवाना झाले आहेत.
दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली असतानाही दिपके यांनी आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, रेल्वे आणि मेट्रो सेवांवरही निर्बंध घालण्यात आले आहे.
अभिजीत दिपके आंदोलनावर ठाम
कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाची घोषणा केली आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला (SIR) विरोध, कथितरीत्या मतदारांची नावे वगळण्यात आल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करणे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनामागील प्रमुख मुद्दे आहेत. CJP चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आंदोलनावर ठाम भूमिका घेतली आहे. त्यांना ज्या ठिकाणी रोखले जाईल, तेच जंतर-मंतर असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आंदोलनासाठी तुरुंगात जाण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तर दिल्लीत रवाना होताना दिपके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “जिंदगी जीने के दो ही तरीके होते हैं… एक जो हो रहा है, होने दो, बर्दाश्त करते जाओ… या फिर जिम्मेदारी उठाओ उसे बदलने की,” असे अभिजित दिपके यांनी म्हटले आहे.CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जंतर-मंतर परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले असून, संसद मार्ग, जनपथ, कॅनॉट प्लेस आणि जंतर-मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काही ठिकाणी अनेक स्तरांमध्ये बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. जमावाला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. परिसरात जमावबंदीच्या आदेशांची माहिती ध्वनिक्षेपकांद्वारे दिली जात आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे 23 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. संभाव्य आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी विशेष व्यवस्था केल्याचेही वृत्त आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. 45 मेट्रो स्टेशनवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांकडे येणाऱ्या किंवा तेथून सुटणाऱ्या काही विशेष आणि मेल रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 75 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय, जंतर-मंतरच्या आसपासच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. काही भागांत मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.




