दामले विद्यालयाचे यश नेत्रदीपक : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे‘ चला शाळेत जाऊया’ उपक्रमांतर्गत दामले विद्यालय, जि.प. शाळा पानवल होरंबेवाडी, झरेवाडीला भेट

रत्नागिरी, दि. 8 : “रत्नागिरीच्या नगरपरिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि गुणवत्तावाढीच्या क्षेत्रात मिळविलेले यश थक्क करणारे आहे. विद्यार्थ्यांमधील ही गुणवत्ता आणि शाळेची उत्तुंग प्रगती प्रत्यक्ष अनुभवणे हे माझे भाग्यच आहे,” अशा शब्दांत शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी विद्यालयाचा गौरव केला.

‘चला शाळेत जाऊया’ या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत श्री. भुसे यांनी दामले विद्यालय, जि.प. शाळा पानवल होरंबेवाडी आणि जि.प. शाळा झरेवाडीला आज भेट दिली. दामले विद्यालयात थेट वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्याची लकेर उमटली. यावेळी त्यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली.


या दौऱ्यात शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या १५ गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अध्यापनात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही त्यांनी सन्मान केला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कला व कार्यानुभव प्रदर्शनाची मंत्र्यांनी बारकाईने पाहणी केली आणि बालवैज्ञानिकांच्या कल्पकतेला दाद दिली.
राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण विभागाच्या भूमिका अभिनय स्पर्धेत विभागीय पातळीवर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी मूल्यशिक्षणावर आधारित एक प्रभावी स्कीट सादर केले. चिमुकल्यांच्या अभिनयाने आणि संवेदनशील सादरीकरणाने उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. यावेळी मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी शाळेचा सातत्याने वाढणारा पट, शैक्षणिक गुणवत्ता आणि सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती पीपीटीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडली. यानंतर त्यांनी पानवल होरंबेवाडी आणि झरेवाडी येथील जि.प. शाळेला भेट दिली. शालेय पोषण आहाराचा दर्जा पाहताना प्रत्यक्षात त्यांनी तो अनुभवला. शिवाय, तेथील स्वच्छता पाहिली.
जिल्हा परिषद शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, समाजकल्याण सभापती ॲङ सुयोग कांबळे, परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे, शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, कोकण बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सचिव पुनिता गुरव, डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिषा कदम-जगदाळे, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी डुबल आणि नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुधाकर मरकुटे यांच्यासह शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन रवींद्र शिंदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button