चिपळुणात विद्यार्थ्यासह तरुणाची आत्महत्या


चिपळूण तालुक्यातील टेरव- वेतकोंडवाडी तसेच वहाळ घडशीवाडी या दोन ठिकाणी तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. सुनील सीताराम बोलाडे (३७, टेरव-वेतकोंडवाडी) तसेच साहिल सुरेश भागडे (१८, वहाळ-घडशीवाडी) अशी आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी चिपळूणसह सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेरव येथील सुनील बोलाडे यांना दारुचे व्यसन होते. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घरात कोणी नसताना त्यांनी घरातील पडवीच्या लोखंडी चॅनेलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, वहाळ-घडशीवाडी येथील साहिल सुरेश भागडे हा बारावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेणारा विद्यार्थी होता. तो वहाळ येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
घरच्या परिस्थितीमुळे महाविद्यालय सुटल्यानंतर दुपारच्या सुमारास तो जवळच्याच एका खासगी रुग्णालयात कामही करत होता. मात्र गुरुवारी रात्री सुमारे ८ च्या सुमारास साहिलने रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्याने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. साहिल हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button