
एपीएमसीत इथेफॉनच्या द्रावणात पिकविलेली केळी जप्त; सुमारे ६७ हजार ८१४ रुपयांची १,३९४ किलो केळी ताब्यात!
मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या कारवाईमध्ये कृत्रिमरित्या केळी पिकविण्यासाठी इथेफॉनयुक्त रसायनाचा थेट वापर होत असल्याचे आढळून आले. या कारवाईमध्ये तब्बल १ हजार ३९४ किलो केळी जप्त करण्यात आली. या केळ्यांची अंदाजे किंमत ६७ हजार ८१४ रुपये आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
एफडीएच्या कोकण विभाग परिमंडळ-३ ला एपीएमसी फळ बाजारामध्ये रसायनांचा वापर करून फळे पिकवली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ५ ऑक्टोबर रोजी दुपारी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंच साक्षीदारांसह तुर्भे येथील एपीएमसी फळ बाजारातील सेक्टर-१९ मधील गाळा क्रमांक एन-९१९ ची तपासणी केली. या तपासमध्ये केळी इथेफॉन या रसायनाच्या द्रावणात थेट बुडवून पिकविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आढळले. संबंधित विक्रेत्याने केळी पिकविण्यासाठी ५ लिटर पाण्यात रसायन मिसळून द्रावण तयार केल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. या कारवाईदरम्यान विक्रीसाठी साठवून ठेवलेला केळ्यांचा उर्वरित साठाही जप्त करण्यात आला. यामध्ये सुंदरी जातीची १९८ किलो, ईलायची जातीची ४९८ किलो आणि खट्टामीठा जातीची ६९८ किलो अशी १ हजार ३९४ किलो केळी जप्त करण्यात आली.
सर्वेक्षणात रसायन बनावट असल्याची शक्यता
जप्त केलेल्या केळ्यांमधून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तीन नमुने आणि केळी पिकविण्यासाठी तयार केलेल्या रसायनमिश्रित द्रावणाचा सर्वेक्षण नमुना घेऊन तो तपासणीसाठी अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आला. रसायनाच्या तपासणीमध्ये रसायन बनावट असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कृत्रिमरित्या पिकविलेली फळे कशी ओळखाल
- फळाचा रंग अतिशय एकसारखा, पिवळा किंवा आकर्षक दिसत असला तरी फळ आतून कच्चे किंवा कठीण असू शकते.
- चवीमध्ये नैसर्गिक गोडवा कमी असून फळ फिके लागण्याची शक्यता असते.
- सालीवर ठिपके, डाग किंवा असमान रंग दिसू शकतो.
- देठाजवळील भाग हिरवट आणि उर्वरित भाग वेगाने पिकलेला दिसू शकतो.
- नैसर्गिकरित्या पिकलेल्या फळांच्या तुलनेत अशी फळे तुलनेने लवकर खराब होऊ शकतात.




