
आ. भैय्या सामंत यांच्या इशारा , आंबा घाट जड वाहनांसाठी खुला!
घटस्थापनेच्या मुहूर्तावर वाहतूक सुरू; व्यापारी वर्गाला मोठा दिलासा
रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातून जड वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे रस्ता खचल्याने अनेक महिन्यांपासून जड वाहनांसाठी बंद असलेला हा मार्ग घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुला झाल्याने व्यापारी वर्गासह वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार भैय्या सामंत यांनी यासंदर्भात प्रशासनाला दिलेल्या सूचनांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
साखरपा येथे आयोजित समस्या निवारण सभेत आंबा घाटातील जड वाहतुकीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे घाटातील रस्त्याचा काही भाग खचला होता, तर एका बाजूची दरड कोसळल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे व्यापारी आणि वाहतूकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
पावसाचा जोर कमी झाल्याने आणि व्यापारी वर्गाची अडचण लक्षात घेता आंबा घाटातील जड वाहनांची वाहतूक तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर आमदार भैय्या सामंत यांनी साखरपा येथील सभेत प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या. घटस्थापनेच्या मुहूर्तावर जड वाहनांसाठी आंबा घाट खुला करावा, अन्यथा स्वतः घाटात येऊन रस्ता खुला करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
या पाठपुराव्यानंतर आंबा घाट जड वाहनांसाठी खुला करण्यात आल्याने अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या वाहतूकदारांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने व्यापारालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आमदार भैय्या सामंत यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना व्यक्त करत नागरिकांकडून त्यांचे आभार मानले जात आहेत. मात्र, घाटातील रस्त्याची स्थिती लक्षात घेता वाहनचालकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सावधगिरीने प्रवास करणे आवश्यक आहे.




