एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राजापूर आगारात विविध उपक्रम; प्रवाशांचे पुष्प देऊन स्वागत, वृक्षारोपणाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश


राजापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राजापूर आगारात विविध सामाजिक, पर्यावरणपूरक व जनसंपर्क उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापक श्री. गोसराडे, आगाराच्या पालक अधिकारी श्रीमती दाते, आगारातील सर्व पर्यवेक्षक अधिकारी, चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी बंधू-भगिनी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात राजापूर बसस्थानक परिसरात एसटी बसची विधिवत पूजा करून करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह व परवडणारी प्रवासी सेवा उपलब्ध करून देणाऱ्या एसटीच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेण्यात आला.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रवाशांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, तसेच त्यांना पेढ्यांचे वाटप करण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवाशांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या या स्वागत उपक्रमाचे कौतुक करत महामंडळाच्या सेवांबद्दल समाधान व्यक्त केले.
याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आगार परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी पर्यावरण संरक्षण, हरित परिसर निर्मिती आणि वृक्ष संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थितांनी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साह, आनंद आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात पार पडला. वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमुळे एसटी महामंडळ आणि प्रवासी यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाले. समाजहित, पर्यावरण संवर्धन आणि उत्कृष्ट प्रवासी सेवा यांचा संदेश देणारा हा कार्यक्रम राजापूर आगारासाठी संस्मरणीय ठरला. एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून ग्रामीण व शहरी भागांना जोडणारी जीवनवाहिनी असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button