लडाखमधील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला रत्नागिरी तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जाहीर पाठिंबा; रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दिल्लीतील जंतर-मंतर येथे पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली लडाखच्या घटनात्मक संरक्षणासाठी सुरू असलेल्या शांततामय आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या संदर्भातील मागण्यांचे एक सविस्तर निवेदन रत्नागिरी तालुकाप्रमुख श्री. मयुरेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्र सरकारला पाठवण्यात आले.

संवादाने प्रश्न सुटावेत, दडपशाहीने नाही:
या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला आधीच पाठिंबा दर्शवला असून, त्यांच्याच आदेशानुसार रत्नागिरी तालुक्याच्या वतीने हे निवेदन देण्यात येत आहे. ‘लोकशाहीत मतभेदांना उत्तर संवादातूनच मिळाले पाहिजे, दडपशाहीने नव्हे’ अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्यात आले असले तरी आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या संवेदनशील विषयावर तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या:
१. देशातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांच्या मागण्यांचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा.
२. जंतर-मंतर येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा, वैद्यकीय मदत आणि सुरक्षित वातावरण तातडीने पुरवण्यात यावे.
३. केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींशी कोणतीही दिरंगाई न करता सकारात्मक चर्चा सुरू करावी.
पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी:
हे निवेदन माननीय पंतप्रधान कार्यालय (PMO), केंद्रीय गृह मंत्रालय आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे आवश्यक त्या कारवाईसाठी तातडीने वर्ग करण्यात यावे, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती:
हे निवेदन सादर करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत, रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे आणि उपतालुकाप्रमुख श्री. विजय देसाई ,स्थानिक नगरसेवक श्री. केतन शेट्ये, नगरसेविका सौ. फौजिया मुजावर, युवासेना उपतालुकाप्रमुख श्री. संदेश नारगुडे, महिला विधानसभा क्षेत्र संघटक सौ. सायली पवार, उपजिल्हा महिला संघटक सौ. राशिदा गोदड, आणि रत्नागिरी महिला शहर प्रमुख सौ. सेजल बोराटे यांच्यासह शहर व तालुका विभागातील विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, इतर पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवासेना सदस्य आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button