
डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती
रत्नागिरी, दि. २१ )- जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आखण्यात आलेल्या डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन नव्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला आहे.
पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
नवनियुक्त अशासकीय सदस्य रविंद्र महादेव नागरेकर (मु. शीळ, पो. ता. राजापूर), दिलीप श्रीपत राणे (मु. पो. तुळशी, ता. खेड) सुलोचना दशरथ कोंबकर (मु. पो. वाल्मिकीनगर, ता. मंडणगड)
डोंगरी भाग विकास कार्यक्रम आणि समितीची रचना:
जिल्ह्यातील मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा व राजापूर हे तालुके ‘पूर्णगट’ म्हणून तर दापोली आणि गुहागर हे तालुके ‘उपगट’ म्हणून डोंगरी भागात समाविष्ट करण्यात आले आहेत. या भागातील विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी व नियोजन करण्यासाठी पालकमंत्री डाॕ सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीची प्रमुख रचना:
अध्यक्ष- पालकमंत्री, सदस्य- डोंगरी भागातील आमदार, अशासकीय सदस्य (डोंगरी भागातील संबंधित) (दोन), अशासकीय महिला सदस्य (डोंगरी भागातील संबंधित) (एक), जिल्हा अग्रणी बँक अधिकारी/समन्वय अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य सचिव- जिल्हा नियोजन अधिकारी.
नवनियुक्त अशासकीय सदस्यांची नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा कार्यालयाकडून सदर नियुक्ती रद्द होईल यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत अबाधित राहील.




