
१६ चौकार, १२ षटकार अन् ६४ चेंडूंत १७३ धावा! मुंबई इंडियन्सच्या नमन धीरचं तुफान; ख्रिस गेलचा रेकॉर्ड अवघ्या २ धावांनी हुकला!
Naman Dhir Record Inning In T20 Cricket : पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पंजाबमध्ये सध्या शेर-ए-पंजाब क्रिकेट लीग २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील आणि आयपीएल गाजवणारे अनेक खेळाडू मैदानात उतरले आहेत.
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, अर्शदीप सिंग यांनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. आता मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज नमन धीर आपल्या वादळी फटकेबाजीमुळे चर्चेत आला आहे. मोहाली किंग्स आणि अमृतसर सुरमास या दोन्ही संघांदरम्यान झालेल्या सामन्यात अमृतसर सुरमास संघाचं नेतृत्व करत असलेल्या नमन धीरने १७३ धावांची रेकॉर्डब्रेक खेळी केली. ख्रिस गेलचा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड अवघ्या २ धावांनी हुकला.
शेर-ए- पंजाब क्रिकेट लीग स्पर्धेत १७३ धावांची खेळी करताच नमन धीरने भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुलचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा रेकॉर्ड हा केएल राहुलच्या नावे होता. त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना १५२ धावांची वादळी खेळी केली होती. आता १७३ धावांची खेळी करताच टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत नमन धीर अव्वल स्थानी पोहोचला आहे.
नमन धीरचं वादळ…
या सामन्यात फलंदाजी करताना नमन धीरने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या ६४ चेंडूंमध्ये १७३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १६ चौकार आणि १२ षटकार खेचले. या धावा त्याने २७०.३१ च्या स्ट्राईक रेटने केल्या. या खेळीच्या बळावर अमृतसर सुरमास संघाने २० षटकांअखेर २७९ धावांचा भलामोठा डोंगर उभारला. या सामन्यात नमन धीर डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आला होता. त्याने १९ व्या षटकापर्यंत फलंदाजी केली. शेवटच्या षटकांत तो बाद झाला. जर तो बाद झाला नसता आणि आणखी ३ धावा जोडल्या असत्या, तर ख्रिस गेलचा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मोडून पुढे गेला असता. हा महारेकॉर्ड अवघ्या ३ धावांनी हुकला.
ख्रिस गेल अव्वल स्थानी…
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत युनिव्हर्स बॉल म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. गेलने आयपीएल २०१३ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं प्रतिनिधित्व करताना पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध खेळताना १७५ धावांची विक्रमी खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने अवघ्या ३० चेंडूंमध्ये वेगवान शतक पूर्ण केलं होतं. आता १३ वर्ष उलटल्यानंतरही हा रेकॉर्ड कुठल्याही फलंदाजाला मोडला आलेला नाही. केएल राहुल आणि नमन धीर हे दोघेही रेकॉर्डच्या जवळ पोहोचले, पण रेकॉर्ड मोडू शकलेले नाहीत.




