एमपीएससीच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढेंना बसवा; रोहित पवारांची मोठी मागणी!

नागपूर : एमपीएससी पेपरफुटी आणि परीक्षांतील कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष असताना आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. आयोगावरील विश्वास वाढविण्यासाठी तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी त्यांनी केली.

अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी

एमपीएससीच्या अध्यक्षपदावर असताना पेपरफुटीचे प्रकरण घडत असेल, तर अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. आयोगाच्या कामकाजाबाबत विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण राहिलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी अध्यक्षपदी नियुक्त करावा, असे ते म्हणाले. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यास विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास वाढण्यास मदत होईल, असा दावा पवार यांनी केला.

तीन दिवसांत निर्णयाची मागणी

गट-ब, पीएसआय आणि कृषी विभागाच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी पवार यांनी केली. पुढील तीन दिवसांत या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येईल. पुण्यात ५० हजार विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा दावा त्यांनी केला.

परीक्षेचा गुणांकन पॅटर्न किंवा इतर महत्त्वाची माहिती आधीच उपलब्ध झाल्यास प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. अशा प्रकारे निवड झालेले अधिकारी पुढे जनतेची सेवा करण्याऐवजी स्वतःचे हित पाहण्याची शक्यता असल्याचेही पवार म्हणाले.

ऑनलाइन परीक्षांच्या पद्धतीवर प्रश्न

ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या कार्यपद्धतीवरही पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. समितीने काम करूनही त्याबाबत निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. कृषी विभागाच्या आकृतिबंधाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाचाही त्यांनी उल्लेख केला. कृषी विभागात प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी न करता समितीच्या माध्यमातून निर्णय घेतले जात असल्याची टीका त्यांनी केली. ऑनलाइन परीक्षांच्या नावाखाली विविध कंपन्यांना कामे दिली जात असून मोठ्या आर्थिक व्यवहारांचा संशय असल्याचेही पवार यांनी सांगितले.

भीमनवारांच्या कार्यकाळातील कंत्राटांची माहिती मागवणार

विवेक भीमनवार आरटीओ आयुक्त असताना त्यांच्या कार्यकाळात कोणती कंत्राटे कोणाला देण्यात आली, याची अधिकृत माहिती पुराव्यांसह मागवणार असल्याचे पवार यांनी सांगितले. या प्रकरणात भीमनवार यांच्यासह इतर अधिकारी आणि काही मंत्रीही अडचणीत येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. एमपीएससीकडून परीक्षेतील गैरप्रकाराचे आरोप नाकारले जात असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. आयोगात परिस्थिती सुधारण्यासाठी सक्षम आणि स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व आवश्यक असल्याचे पवार यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button