मराठवाड्यातून थेट कोकणासाठी गणेशोत्सव विशेष रेल्वे!

नांदेड-सावंतवाडी रोड विशेष गाडी; खेड, चिपळूण, रत्नागिरीसह कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबा


गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते सावंतवाडी रोड दरम्यान गणेशोत्सव विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यातून थेट कोकणाशी रेल्वेने जोडणारी ही विशेष गाडी नांदेड– पुणे– कल्याण– रत्नागिरी–सावंतवाडी रोड मार्गावर धावणार आहे. विशेष म्हणजे या गाडीला खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी यांसह कोकणातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक ०७६५९ नांदेड–सावंतवाडी रोड विशेष या गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. ही गाडी १२ आणि १५ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड येथून रात्री ८ वाजता सुटेल. मार्गातील विविध स्थानकांवर थांबे घेत ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे.
कोकणातून मराठवाड्याकडे परतण्यासाठी गाडी क्रमांक ०७६६० सावंतवाडी रोड–नांदेड विशेषच्या दोन फेऱ्या नियोजित आहेत. ही गाडी १४ आणि १७ सप्टेंबर २०२६ रोजी सावंतवाडी रोड येथून सकाळी ७.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता नांदेड येथे पोहोचेल.
या विशेष गाडीला नांदेड, पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, येडशी, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत.
त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबई किंवा पुणे मार्गे स्वतंत्र प्रवास करण्याची गरज कमी होणार असून, खेड- चिपळूण- रत्नागिरीसह कोकणातील विविध भागांत थेट पोहोचण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
गणेशोत्सवातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या विशेष गाडीला एकूण २४ डबे जोडण्यात आले आहेत. त्यामध्ये २-टियर एसीचे ३ डबे, ३-टियर एसीचे ५ डबे, शयनयानाचे १० डबे, सामान्य द्वितीय श्रेणीचे ४ डबे आणि एसएलआरचे २ डबे असतील. या विशेष गाडीसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष भाडे दर आकारण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता नांदेड-सावंतवाडी रोड विशेष रेल्वेचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः मराठवाड्यातील गणेशभक्तांना खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील विविध भागात पोहोचण्यासाठी या रेल्वेचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button