
गांजा पिताना हटकल्याचा राग, नरधमाचा स्टेशनवरच पोलिसा वर प्राण घातक हल्ला, पुण्यातली धक्कादायक घटना!
: पुणे रेल्वे स्थानक परिसरात एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यावर ४ जणांच्या टोळक्याने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर ही घटना घडली. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अक्षय बोंबाळे असे जखमी झालेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी स्वतः या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून विकी पात्र, रॉकी पात्र आणि त्यांच्या 2 अज्ञात साथीदारांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे आपले काम संपवून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या समोरील रोडवरून जात असताना आरोपींनी त्यांना अडवलं.
तुला आता जिवंत सोडणार नाही
“मी विकीच्या आईला तो दारू आणि गांजा पितो असं सांगितलं,” असा संशय आरोपी विकीच्या मनात होता. याच गैरसमजातून आरोपींनी अक्षय बोंबाळे यांच्याशी तीव्र वाद घालण्यास सुरुवात केली. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना “तुला आता जिवंत सोडणार नाही” अशी थेट धमकी दिली आणि त्यांच्यावर हल्ला चढवला.
कर्मचाऱ्याच्या गळ्यावर वार केला
हल्ला करताना आरोपींच्या दोन अज्ञात साथीदारांनी फिर्यादीचे हातपाय घट्ट पकडून ठेवले. यानंतर विकीने चाकू काढून कर्मचाऱ्याच्या गळ्यावर वार केला, तर रॉकीने त्यांच्या छातीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. अचानक झालेल्या या भयंकर हल्ल्यात पोलीस कर्मचारी अक्षय बोंबाळे रक्ताच्या थारोळ्यात पडले.
सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावली
वार केल्यानंतर आरोपींनी जखमी कर्मचाऱ्याजवळील मोबाईल आणि गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि तिथून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात एकच घबराट पसरली होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बंडगार्डन पोलिसांकडून आरोपींचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.




