
डायलिसिस सुरू होते तरी सेवेत तत्पर असलेल्या आशा सेविकेचा मृत्यू
लेकाचे मातृछत्र हरपले; कुटुंबावर शोककळा

दापोली
आरोग्य विभागातील आशा सेविका या राज्यातील ग्रामीण भागातील थेट जनसंपर्क असणाऱ्या व आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतत कार्यरत असतात. कोकणातील दोन्ही किडन्या फेल असलेल्या आठवड्यातून दोनदा डायलिसिस सुरू होतं तरीही आपल्या सेवेत अत्यंत तत्पर असलेल्या आशा सेविकेचा दुर्देवीरित्या आकस्मिक मृत्यू झाला आहे. साक्षी संदेश भैरमकर (वय ४४) असे या आशा सेविकेचे नाव आहे. दापोली तालुक्यातील गिम्हवणे परिसरातील तत्पर आशा सेविका अशी त्यांची ओळख होती.
गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशीही आपल्या आरोग्य सेवेत त्या कार्यरत होत्या रजिस्टर लिहिणे मीटिंगची तयारी करणे आधी काम त्यांनी केली. त्याआधी त्यांनी बचत गटाची मीटिंगही अटेंड करून त्या सायंकाळी घरी आल्या. गुरुवारी 22 ऑक्टोबर रोजी साक्षी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घरी जेवण करुन झोपत असतानाच त्यांना अचानक उलटी झाली व त्यांना अस्वस्थ वाटु लागल्याने पती संदेश व मुलगा सिद्धेश यांनी तात्काळ उपचाराकरीता दापोली शहर परिसरातील भागवत हॉस्पीटल येथे दाखल केले. डॉक्टरांनी तपासुन पुढील उपचाराकरीता दापोली उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यास सांगितले त्यांना दखल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासुन त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. साक्षी यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. इतकच नव्हे तर एकुलता एक असलेला महाविद्यालयीन युवक असलेला लेक सिद्धेश याचे मातृछत्र हरपले आहे. साक्षी या कुटुंबाच्या मोठ्या आधारस्तंभ होत्या. साक्षी यांच्या मृत्यूनंतर मुलगा सिद्धेश व त्यांच्या कुटुंबीयांनी व त्यांच्या सोबत काम करणाऱ्या आशा सेविका, मैत्रिणींनी केलेला आक्रोश हा हृदय पिळवटून टाकणार होता.
गेल्या दोन वर्षांपासून साक्षी यांना किडन्यांचा त्रास सुरू झाला होता. तेव्हापासून त्यांना आठवड्यातून दोन दिवस डायलिसिस करावा लागत असे. डायलिसिस केल्यानंतर त्यांची प्रकृती चांगली असे त्या आशा सेविका म्हणून गेली काही वर्ष आरोग्य विभागाच्या सेवा देत होत्या. कोरोना कालावधीतही त्यांनी उत्तम आरोग्य सेवा दिली होती. इतकच नाही तर लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेलाही त्यांनी अनेकांना फॉर्म भरणे ऑनलाईन लॉगिन करून कागदपत्र अपलोड करणे त्यासाठी संपर्क करणे घरोघरी फिरून आरोग्य सेवा देण्याबरोबरच लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्र जमा करून या सेवेचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. याचबरोबर त्या सामाजिक क्षेत्रातही त्या सक्रिय होत्या. अनेकांना मदत करणे मार्गदर्शन करणे आरोग्यविषयक धावपळ करणे हा त्यांचा सेवेबरोबरच सामाजिक बांधिलकीचा आवडीचा विषय होता होता. त्यांच्या मृत्यूमुळे गिम्हवणे व अवघ्या दापोली तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी त्यांच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. साक्षी यांचे माहेर महाड येथे असून त्या रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सुकन्या होत्या. साक्षी यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सासू तसेच आई-वडील दोन भाऊ भावजय असं मोठं कुटुंब आहे. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.




