लोगो… मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा

कोकणातून जास्तीत जास्त खेळाडू ऑलिंपिकला जावेत- डॉ. मनोज रेड्डी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात स्पर्धेचे शानदार उद्घाटन

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठात दरवर्षी ४० प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होतात, यातून यंदापासून प्रथमच सर्वोत्कृष्ठ खेळाडू पुरुष व महिला निवडण्यात येणार आहे. तसेच क्रीडा संचालकांना पारितोषिक आणि मिशन ऑलिंपिक मोडवर प्रशिक्षकांसाठीही विशेष तरतूद करण्यात येत आहे, कोकणातूनही जास्तीत जास्त खेळाडू ऑलिंपिकला गेले पाहिजेत याकरिता विद्यापीठाच्या किमान ५ ते १० स्पर्धा कोकणातच व्हायला हव्यात, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू झाल्या. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी जिमखाना विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर केळकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, निवड समिती सदस्य डॉ. विश्वंभर जाधव, डॉ. आदित्य कुलकर्णी, जयदीप कदम, तायक्वांदो आंतरराष्ट्रीय रेफ्री व राष्ट्रीय फेडरेशनचे संचालक सुभाष पाटील, तायक्वांदो असोसिएशने अध्यक्ष व्यंकटेशराव कररा, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रबंधक नंदकिशोर गोळपकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे उपस्थित होते. दीपप्रज्वलन व मैदानावर श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. मनोज रेड्डी यांनी केले.

या स्पर्धेतून निवड झालेले विद्यार्थी राजस्थान आणि नोएडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय तायक्वांडो स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. तायक्वांडो हा खूप शिस्तीचा खेळ असून आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळात भारताला पदक मिळाले पाहिजे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी विद्यापीठाचा शुभम शेट्टी हा खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला. त्यासाठी विद्यापीठाने अडीच लाख रूपये अनुदान दिले. अशा प्रकारे खेळाडूंसाठी निधी देण्याकडे कल आहे, असे श्री. रेड्डी म्हणाले. याप्रसंगी त्याचा सन्मानही श्री. रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आला.

या स्पर्धेसाठी तीन वर्षांपासून सेन्सरवर स्पर्धा घेत आहोत. तसेच नवीन नियमांचा अवलंब केला जात असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंचही येतात. खेळाची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी विद्यापीठातर्फे खेळाडूचे वजन केले जाते, वेळापत्रक सर्वांसमोरच तयार केले जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच सुभाष पाटील यांनी भारतभर नाव कमावले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित व दर्जेदार पंच काम पाहणार आहेत. विविध संघटनांमुळेही तायक्वांडो खेळ वाढत आहे. स्पर्धेत काही चूक झाल्यास ती पुढील स्पर्धेवेळी सुधारणा करू, अशी ग्वाही मनोज रेड्डी यांनी दिली.

खेळामुळे मानसिक संतुलन- डॉ. चंद्रशेखर केळकर
अध्यक्षीय मनोगतात डॉ. चंद्रशेखर केळकर म्हणाले की, तायक्वांदो या खेळामध्ये नुसते आत्मरक्षण नसून शिस्त, आत्मविश्वास, एकाग्रता, संयम आणि आत्मनियंत्रणाचा मोठा संगम आहे. खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. खेळामुळे शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक संतुलन आणि उत्तम आरोग्य लाभते. मैदानावरील प्रत्येक खेळाडू जिंकण्याच्या जिद्दीने उतरत असला, तरी विजय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हरलेल्या खेळाडूंना चुका सुधारून भविष्यात अधिक चांगला खेळ करण्याची संधी मिळते.

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सांगितले की, आमचे महाविद्यालय स्वातंत्र्यपूर्व काळातील (१९४५ मध्ये स्थापन झालेले) असून, या स्वायत्त महाविद्यालयात सुमारे ७,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे विविध २८ विषयांमध्ये पदवी, १६ विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि ८ विषयांमध्ये पीएचडी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

या स्पर्धेत ५१ महाविद्यालयांतून १०० पुरुष व १०० महिला स्पर्धकांनी भाग घेतला असून चार दिवस या स्पर्धा सुरू राहणार आहेत. सर्व मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन डॉ. केळकर, डॉ. साखळकर, डॉ. भिडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. मृदूला जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विनोद शिंदे यांनी आभार मानले.

ऑलिंपिकला खेळाडू जावेत
कोकणात मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धा होण्याकरिता मी आग्रही असल्याचे सांगून क्रीडा विकासासाठी व खेळाडू घडवण्यासाठी हे आवश्यक असल्याचे सांगितले. ४० पैकी किमान १० स्पर्धा येथे व्हायला हव्यात. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शाळा, महाविद्यालयांत हजारो विद्यार्थी शिकत असून आपले खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धा, ऑलिंपिकला न्यायचे असतील तर शालेय जीवनातच क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी लागेल ते सहकार्य करू, अशी ग्वाही रेड्डी यांनी दिली. सुट्टीचा वार असूनही महाविद्यालय, प्राचार्य, उपप्राचार्य, प्रबंधक यांच्यासमवेत सर्व टीम काम करत असल्याचे पाहून क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आपले प्रयत्न योग्य दिशेने असल्याचे त्यांनी नमूद केले. मुले नुसती मोबाईलवर गेम खेळत असतात, त्यापेक्षा ती मैदानावर आली पाहिजेत आणि मला खात्री आहे मैदानावर आली ना, त्यांचा शारीरिक, मानसिक सगळा विकास होईल व मुले अभ्यासातही चांगले सादरीकरण करू शकतील, असा विश्वास डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button