वडिलांचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाला काळानं गाठल्याची दुर्दैवी घटना


रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील पूर-झेपलेवाडी येथून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी दुर्देवी घटना समोर आली आहे. आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाला काळानं गाठल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. धीरज रामचंद्र झेपले असे मृत पावलेल्या २७ वर्षीय तरुणाचे नाव असून, या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवाने, वडिलांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

देवरूख पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर-झेपलेवाडी येथील रामचंद्र बुधाजी यांच्या घराच्या इलेक्ट्रिक बोर्डातून बाथरूमसाठी वायर नेण्यात आली होती. ही वायर छपराच्या लोखंडी अँगलवरून टाकण्यात आली होती. दरम्यान, ही वायर कुठेतरी कट झाल्यामुळे संपूर्ण लोखंडी अँगल आणि सळीमध्ये विजेचा तीव्र प्रवाह उतरला होता. शनिवारी (२४ ऑक्टोबर) सायंकाळी रामचंद्र झेपले हे आंघोळीसाठी पाणी काढण्यासाठी जात असताना, नकळतपणे त्यांचा हात त्या लोखंडी सळीला लागला. सळीत करंट असल्यामुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते जागीच बेशुद्ध होऊन खाली पडले.वडील अचानक बेशुद्ध होऊन पडल्याचे पाहताच त्यांचा मुलगा धीरज त्यांना वाचवण्यासाठी तातडीने धावत गेला. मात्र, नेमके काय घडले आहे हे समजण्यापूर्वीच त्याचाही स्पर्श त्या लोखंडी सळीला झाला. विजेचा तीव्र झटका बसल्याने धीरजही जागीच बेशुद्ध होऊन खाली कोसळला.

घटनेनंतर तातडीने त्याला देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तपासून धीरज उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर रविवारी शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button