कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी पुरवठ्याला दिलासा


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल; रिफिल बुकिंगमधील कालावधी ४५ दिवसांवरून २५ दिवसांवर


राजापूर : कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले तात्पुरते निर्बंध शिथिल करण्यात आले असून, दोन रिफिल बुकिंगमधील किमान कालावधी ४५ दिवसांवरून कमी करून २५ दिवस करण्यात आला आहे. आमदार प्रमोद जठार यांनी याबाबत माहिती दिली.

या निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना स्वयंपाकाच्या इंधनासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामीण भागात संयुक्त कुटुंब पद्धती, कुटुंबातील सदस्यांची संख्या तसेच दैनंदिन वापराचे प्रमाण अधिक असल्याने एका सिलेंडरवर ४५ दिवस काढणे अनेकांसाठी कठीण ठरत होते.

दरम्यान, गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी आणि कुटुंबीय कोकणात आपल्या गावी येत असल्याने घरगुती एलपीजीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार प्रमोद जठार यांनी संबंधित प्रशासन, जिल्हाधिकारी, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच तेल विपणन कंपन्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

या पाठपुराव्याला यश मिळाल्यानंतर ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांसाठी दोन रिफिल सिलेंडरच्या बुकिंगमधील किमान अंतर ४५ दिवसांवरून २५ दिवसांवर आणण्यात आले आहे. या निर्णयामुळे कोकणातील हजारो एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून, गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी गॅसची मागणी पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण कुटुंबांना स्वयंपाकाच्या इंधनासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होण्यास या निर्णयामुळे मदत होणार असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी पुरवठा अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button