आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश; सैनिकांच्या प्रश्नांवर उद्या मंत्रालयात बैठक

चिपळूणमध्ये सैनिक विश्रामगृह व सैनिक-माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतिगृह उभारणीच्या मागणीवर चर्चा

चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत चिपळूणमधील सैनिक व माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता मुंबईतील मंत्रालयात ही बैठक होणार आहे.

चिपळूण येथे सैनिक विश्रामगृह उभारणे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सैनिक व माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देणे, या प्रमुख मागण्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

चिपळूण परिसरात सैनिक व माजी सैनिकांची संख्या मोठी असून, त्यांच्या सुविधांसाठी स्वतंत्र सैनिक विश्रामगृहाची आवश्यकता असल्याची मागणी आमदार निकम यांनी शासनाकडे सातत्याने केली होती. तसेच शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या सैनिक व माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध व्हावी, अशीही मागणी करण्यात आली होती.

या मागण्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आल्याने सैनिक कल्याणाच्या प्रश्नांना शासनस्तरावर गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाच्या माजी सैनिक कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, माजी सैनिक कल्याण संचालनालयाचे अधिकारी, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचे अधिकारी तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे चिपळूणमधील सैनिक विश्रामगृह आणि सैनिक व माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतिगृह उभारणीचा प्रश्न आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून, या बैठकीत शासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सैनिक व माजी सैनिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button