रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी शिखरावर पोहोचली- डॉ. मुकुंदराव जोशी


अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता


रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय स्थापनेची मुहुर्तमेढ सभा आमच्या घरी झाली होती. आज सुवर्णमहोत्सव पाहता आला याचा खूप आनंद वाटतोय. संस्थापक कै. बाबुराव जोशी व कै. मालतीबाई जोशी यांच्या दूरदृष्टीतून हे महाविद्यालय सुरू झाले व आज कोकणातील विद्यार्थ्यांना करिअरची संधी मिळाली. आजही संस्थेची घोडदौड सुरू आहे. नवीन इमारती उभ्या राहत आहेत. या सर्व कीर्तीच्या गोष्टी मोठ्या शिखरावर घेऊन जातील, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तथा बाबुराव जोशी व मालताबाई जोशी यांचे नातू डॉ. मुकुंद जोशी यांनी केले. बाबुराव जोशी व मालतीबाई जोशी काकर्यक्रम पाहत आहेत, तेव्हा कष्ट घेतले, रोपट्याचा वृक्ष झाला. खऱ्या अर्थाने तालमिलाफ कार्यक्रमाने खरी आदरांजली दिली.

मुहुर्तमेढ सभेला कुलकर्णी सर, बावडेकर सर, ग. ल. सोहोनी, ल. ग. पटवर्धन आदी घरी आले होते. तेव्हा हे मोठे आव्हान होते. मी तेव्हा आठवी-नववीत होतो. हे कॉलेज सुरू केले नाही, तर नुकसान होईल, असे ठामपणे सांगितले व हे कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले.

खातू नाट्यमंदिरात अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर, आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक, देणगीदार भालचंद्र खातू, उद्योजक दीपक गद्रे, नियामक मंडळ सदस्य मनोज पाटणकर, सचिन वहाळकर, सल्लागार मंडळ सदस्य संतोष गुरव, जिल्हा परिषद सदस्य अॅड. महेंद्र मांडवकर आणि सुवर्ण महोत्सव समन्वयक प्रा. वैभव कानिटकर उपस्थित होते.

दीपप्रज्वलन, ईशस्तवन व महाविद्यालय गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रास्ताविकात श्रीकांत दुदगीकर म्हणाले आजचा दिवस अत्यानंदाचा असून भविष्याचा वेध घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांसमोर बदल, स्पर्धा आणि अनेक प्रकारची आव्हाने आहेत. तंत्रज्ञानातील आव्हाने शिक्षकांसमोरही आहेत. विद्यार्थ्यांना रिल लाईफमधून रिअल लाईफमध्ये आणणे हे मोठे आव्हान आहे. याप्रसंगी देणगीदारांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यवाह सतीश शेवडे यांनी सांगितले की, सुवर्णमहोत्सवासाठी सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली. माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. माजी शिक्षक, विद्यार्थ्यांना जुन्या आठवणी जागवण्याची संधी मिळाली. आता यापुढे दर्जेदार कामगिरी करत १० वर्षांनी हीरक महोत्सव साजरा करण्यासाठी उद्यापासून तयारी करूया.

उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर यांनी कार्याध्यक्ष शिल्पाताईंचे विशेष कौतुक केले. गेल्या दहा वर्षांत संस्थेने गरुडझेप घेतली असून जांभेकर विद्यालयाचा शतक महोत्सव, शिर्के प्रशालेचा अमृत महोत्सव, कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना विद्यार्थ्यांसाठी भव्य संकुल उभारण्याचे स्वप्न शिल्पाताईंच्या कुशल नेतृत्वात पूर्ण होणार असल्याचा विस्वास त्यांनी व्यक्त केला. प्रा. प्रभात कोकजे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वैभव कानिटकर यांनी आभार मानले.

बारावीतील गुणवंतांचा सत्कार
बारावीतील गुणवंत अयमान माझगावकर, गार्गी इनामदार, श्रिया केळकर, आस्था पुनस्कर, मितेश चिके, पार्थ चितळे, जान्हवी सावंत, सई अवसरे अयमान दसुरकर, सलोनी ताम्हणकर, रिया मयेकर, साक्षी हरळीकर आणि निर्मिती सुर्वे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संस्कृत, बुक कीपिंग अॅंड अकाउंटन्सी, कॉम्प्युटर सायन्स, आयटी आणि गणित विषयात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गौरवण्यात आले. त्यांच्या पालकांचेही कौतुक करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button