ब्रेक निकामी झाल्याने रिक्षा टेम्पो गवळीवाडा उतारात पलटी; मोठा अनर्थ टळला


रत्नागिरी शहरातील गवळीवाडा परिसरातील तीव्र उतारावर मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रिक्षा टेम्पोचा ब्रेक अचानक निकामी झाल्याने टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालकासह दोघेजण जखमी झाले असून, टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक रिक्षा टेम्पो गवळीवाडा परिसरातील तीव्र उतारावरून धनजीनाका परिसराच्या दिशेने जात होता. उतारावर येताच टेम्पोचे ब्रेक अचानक निकामी झाले. तीव्र उतार आणि ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

गवळीवाडा परिसरात पादचारी तसेच वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र, ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून वाहनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे टेम्पोने इतर वाहनांना किंवा नागरिकांना धडक न देता रस्त्याच्या कडेला पलटी घेतली आणि मोठा अनर्थ टळला.

या अपघातात जखमी झालेल्या दोघांवर तातडीने उपचार करण्यात आले असून, टेम्पोचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button