
जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान; मोफत समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन
रत्नागिरी, दि. ८ ) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी राज्यभरात “श्रीगणेशा आरोग्याचा अभियान २०२६” राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर कालावधीत समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई अंतर्गत ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष’ व ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’ यांच्या समन्वयाने ही मोहीम राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे.
शिबिरामध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रमुख सेवा
विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या, आवश्यक रक्त चाचण्या, ईसीजी (ECG) तपासणी, इतर अनुषंगिक व उपचारात्मक तपासण्या आणि मोफत औषधोपचार
ही शिबिरे यशस्वी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय आयुक्त, नगरपालिका प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि STEMI समन्वयकांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था तसेच शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या सहकार्याने ही शिबिरे पार पडणार आहेत. यासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल कर्मचारी, निदानात्मक साधने आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




