लांजा: तालुक्यात गणेशोत्सवासाठी दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी लांजा आगार सज्ज..

लांजा आगाराकडून मुंबईकर गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी १९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या कालावधीत एकूण १५६ जादा गाड्या सुटणार असून सर्वाधिक १०३ जादा गाड्या रविवार २० सप्टेंबर रोजी सुटणार आहेत.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुंबईकर दाखल होतात. जादा गाड्या, मोफत बससेवा व रेल्वेने मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी लांजा आगाराकडून दरवर्षी सुयोग्य असे नियोजन केले जाते. यावर्षीही लांजा आगाराने यासाठी नियोजन केले आहे.

गौरी गणपती विसर्जनानंतर गणेशभक्त परतीच्या प्रवासाला लागतात, त्यामुळे आज विसर्जनानंतर लांजा आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. बोरीवली, नालासोपारा, ठाणे, मुंबई, कल्याण, परळ, विरार, डोंबिवली व भांडूप या मार्गावर लांजा आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

दरम्यान, शनिवार १९ सप्टेंबर रोजी ५, रविवारी २० रोजी सर्वाधिक म्हणजे १०३ तसेच २१ रोजी ४३ आणि २२ रोजी ५ अशा १५६ जादा गाड्यांचे आरक्षण झालेले आहे. दुपारनंतर या सर्व गाड्या सोडण्यात येणार असून यासाठी लांजा आगार प्रशासनाने विशेष नियोजन केले असून अधिकारी व कर्मचारी वर्ग यासाठी विशेष परिश्रम घेत असल्याचे लांजा आगाराचे वाहतूक निरीक्षक ललित आयरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button