
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दापोली पोलीस ॲक्शन मोडवर; बाजारपेठेत पायी गस्त आणि सुरक्षेचा कडक बंदोबस्त
दापोली:
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी दापोली पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, संपूर्ण बाजारपेठेत पोलिसांकडून विशेष बंदोबस्त आणि पायी गस्त सुरू करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी दापोलीच्या बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेऊन चोरी, पाकीटमारी आणि छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. बाजारपेठेत वाहतूक नियंत्रण सुरळीत ठेवण्यासोबतच व्यापाऱ्यांना व दुकानदारांना सुरक्षेच्या विविध सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी सुरक्षितपणे आणि आनंदाने दिवाळी साजरी करावी, यासाठी दापोली पोलिसांच्या वतीने विशेष आवाहन करण्यात आले आहे.
सदर पोलीस बंदोबस्त व कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरसकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. राजकुमार यादव, स्वप्नील हत्तीकट्टी यांच्यासह दापोली पोलीस ठाण्यातील अन्य पोलीस अंमलदार सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.




