
भातकापणीसाठी आईसोबत शेतात गेलेल्या १२ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
ओणी माळीवाडीतील हृदयद्रावक घटना; खेळताना अचानक चक्कर येऊन कोसळली, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
राजापूर : तालुक्यातील ओणी माळीवाडी येथे आईसोबत भातकापणीसाठी शेतात गेलेल्या १२ वर्षीय शाळकरी मुलीचा अचानक चक्कर येऊन पडल्याने उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे ओणी परिसरासह संपूर्ण राजापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओणी माळीवाडी येथील रहिवासी दीपक जानू गितये यांच्या पत्नी देवयानी या गुरुवारी आपली मुलगी गौरी (वय १२) आणि मुलगा जयेश यांना सोबत घेऊन शेतात भातकापणीच्या कामासाठी गेल्या होत्या. देवयानी या शेतात भातकापणीचे काम करत असताना गौरी आणि तिचा भाऊ जयेश जवळच खेळत होते. खेळत असतानाच सायंकाळच्या सुमारास अचानक गौरीला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली.
मुलगी अचानक खाली पडल्याचे पाहताच आईने तातडीने मदतीसाठी धाव घेतली. नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने गौरीला सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ओणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दिवाळीचा सण आणि भातकापणीचा हंगाम सुरू असतानाच खेळत्या-वाढत्या वयातील १२ वर्षीय गौरीचा असा अचानक मृत्यू झाल्याने गितये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, मयत गौरीचे वडील दीपक जानू गितये यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ मधील कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ७०/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.




