राज्यात दुष्काळ जाहीर; रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांचा समावेश


रत्नागिरी : चालू २०२६ च्या खरीप हंगामात पावसाची झालेली मोठी तूट आणि प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ अंतर्गत ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) लागू करत मदत व पुनर्वसन विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. विशेष म्हणजे, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

शासनाच्या निर्णयानुसार जून महिन्यापासून आजतागायत झालेल्या अपुऱ्या पर्जन्यमानामुळे बाधित झालेल्या या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणासाठी तात्काळ उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तात्काळ पिकांचे पंचनामे सुरू करण्यात येणार असून, सर्व्हेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांचे फोटो आणि जीपीएस कोऑर्डिनेट्स संकलित करून कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने विविध सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या कर्जवसुलीस स्थगिती, तसेच कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांची कृषी पंपांची वीजजोडणी खंडित न करण्याचे सक्त आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

ग्रामीण भागातील रोजगार टिकवून ठेवण्यासाठी रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू केली जातील. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक तिथे टँकर्सची सोय करणे, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करणे, अन्नधान्याची टंचाई भासू न देणे आणि जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या भरपाईपोटी मिळणारी प्रत्यक्ष आर्थिक मदत विहित प्रक्रियेनंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे लवकरच जाहीर केली जाईल, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button