
रत्नागिरीतील मुग्धनाद संगीत अकॅडमीतर्फे २ ऑक्टोबरला “नाट्यकुंतल”

रत्नागिरी : दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी येथील मुग्धनाद संगीत अकॅडमीतर्फे कै. गजानन भट यांच्या स्मृती प्रित्यर्थ अकॅडमीच्या विद्यार्थांचा “नाट्यकुंतल” कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता शहरातील
गुरुकृपा मंगल कार्यालय, पऱ्याची आळी येथे होणार आहे.
या कार्यक्रमात वेगवेगळे सांगितीक विषय घेऊन मुलांच्या कला गुणांना चालना दिली जाते व या कार्यक्रमातून दरवेळी विद्यार्थांना एक वेगळा अनुभव व वेगळे शिकायला मिळेल यावर भर दिलेला असतो. यावर्षी या कार्यक्रमाचा विषय “साभिनय नाट्यसंगीत” असा आहे.
“नाट्यकुंतल” या कार्यक्रमात ४० विद्यार्थी साभिनय नाट्य संगीत सादर करणार आहेत. कोकणाची संगीत नाटक परंपरा जपण्यासाठी नवीन हुशार गायक नट व नटी यातून कदाचित गवसतील या दृष्टिकोनातून हा विषय निवडला आहे.
सर्व नाट्य रसिक व संगीत प्रेमीनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन मुग्धनाद संगीत अकादमीच्या संचालिका, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका सौ. मुग्धा भट-सामंत यांनी केले आहे.




