पंतप्रधान मोदींकडून महिला संघाचं कौतुक,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडूनही अभिनंदन


महिला आशिया कप 2026 चे विजेतेपद पटकावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. त्यांनी संघाच्या आत्मविश्वास, सातत्य आणि उत्साहाचे कौतुक करत हा विजय देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय क्रिकेटसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आशिया कप जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघाचे अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेत संघाचा आत्मविश्वास, सातत्य आणि उत्साह स्पष्टपणे दिसून आला. या विजयामुळे देशभरातील लाखो युवा मुलींना खेळण्यासाठी आणि सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडूनही अभिनंदन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही भारतीय महिला संघाला आशिया कप विजेतेपदासाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण स्पर्धेत संघाने एकजुटीने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे त्यांनी म्हटले. भारतीय संघाने स्पर्धेतील सर्व सामने जिंकत दमदार कामगिरी केली आणि देशाचा गौरव वाढवला. भारतीय महिला खेळाडू देशातील तरुणांसाठी, विशेषतः मुलींसाठी, मोठ्या प्रेरणास्थान आहेत, असे राष्ट्रपतींनी नमूद केले.

अमित शाह यांनीही केलं कौतुक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. भारताने आशियाई क्रिकेटमध्ये आणखी एक मैलाचा दगड गाठल्याचे त्यांनी म्हटले. महिला आशिया कपचे आठव्यांदा विजेतेपद मिळवल्याबद्दल त्यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. संपूर्ण स्पर्धेतील संघाचे वर्चस्व आणि दमदार कामगिरीने देशातील लाखो क्रिकेट चाहत्यांना प्रेरणा दिल्याचे शाह यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button