
जपानी पाहुण्याच्या कॅमेऱ्यात कैद झाला जैतापूरचा गणेशोत्सव!
बाप्पाच्या भक्तीने भारावला परदेशी पर्यटक; जैतापूरकरांची आपुलकी आणि आदरातिथ्याचे केले कौतुक
राजापूर : गणेशोत्सव म्हटला की कोकणच्या गावागावात दिसणारी भक्ती, उत्साह आणि माणुसकी अनुभवण्यासाठी यंदा एका परदेशी पाहुण्यानेही जैतापूरचा रस्ता धरला. जपानहून आलेल्या एका पर्यटकाने जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहून कोकणातील गणेशोत्सवाचा मनमुराद आनंद घेतला.
गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा, भक्तिमय वातावरण, बाप्पाच्या जयघोषात सहभागी झालेले भाविक आणि गावकऱ्यांचा उत्साह पाहून हा जपानी पाहुणा अक्षरशः भारावून गेला. त्याने गणेशमूर्ती, प्रतिष्ठापना सोहळा आणि परिसरातील उत्सवी वातावरणाचे फोटो तसेच व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात टिपून घेतले.
‘गावची माणसं अधिक प्रेमळ…’
मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना या पर्यटकाने जैतापूरच्या गणेशोत्सवाबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. आपण गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात येत असून, यंदा प्रथमच जैतापूरचा गणेशोत्सव प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली, असे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाइतकीच त्यांना जैतापूरकरांची माणुसकीही भावली. शहरातील आणि गावातील लोकांच्या वागणुकीत फरक जाणवतो. शहराच्या तुलनेत गावातील माणसे अधिक प्रेमळ, मनमोकळी आणि आपुलकीने वागतात, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
कुतूहलाच्या नजरा… पण मनापासून मिळाले प्रेम!
परदेशी व्यक्तीचा चेहरा आणि व्यक्तिमत्त्व स्थानिकांपेक्षा वेगळे असल्याने काही जण कुतूहलाने आपल्याकडे पाहतात, त्यामुळे सुरुवातीला थोडासा संकोच वाटतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. मात्र, जैतापूरकरांच्या प्रेमळ वागणुकीमुळे हा संकोच दूर झाला आणि येथील आदरातिथ्य मनापासून आवडल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणची संस्कृती पोहोचली परदेशी पाहुण्याच्या मनापर्यंत!
जैतापूरच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका परदेशी पाहुण्याला कोकणची श्रद्धा, परंपरा, उत्सवाची भव्यता आणि त्यामागची माणुसकी जवळून अनुभवता आली. त्याच्या कॅमेऱ्यात कैद झालेला जैतापूरचा गणेशोत्सव आणि ग्रामस्थांचे प्रेम हा स्थानिकांसाठीही आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला.
यावेळी जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या जपानी पाहुण्याचे औचित्यपूर्ण स्वागत करून सन्मान करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, पत्रकार राजन लाड, खजिनदार श्रीकृष्ण राऊत, सचिव सुनील करगुटकर, मनीष करगुटकर, महेश नारकर, रेशम लाड, राजेंद्रप्रसाद राऊत, गजानन करमळकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




