
गणेशोत्सवात CNG चा ठणठणाट; खेडमध्ये पंपांवर दीड-दोन किलोमीटरच्या रांगा
मुंबई-पुण्याहून कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांचे हाल; CNG संपल्याने तासनतास प्रतीक्षा
खेड : कोकणातील प्रमुख सण असलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून लाखो चाकरमानी आपल्या गावाकडे दाखल होत आहेत. मात्र कोकणात पोहोचल्यानंतरही त्यांच्या अडचणी संपताना दिसत नसून, खेड तालुक्यातील CNG पंपांवरील तुटवड्यामुळे वाहनचालकांचे मोठे हाल होत आहेत. खेडमधील विविध CNG पंपांवर वाहनांच्या तब्बल दीड ते दोन किलोमीटर लांब रांगा लागल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले.
मुंबई-पुण्याहून कोकणात येण्यासाठी आठ ते दहा तासांचा प्रवास केल्यानंतर आता CNG भरण्यासाठीही वाहनचालकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
CNGचा साठा संपल्यानंतर नवीन गॅस उपलब्ध होण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने पंपांवर वाहनांच्या रांगा वाढत आहेत. परिणामी गणेशोत्सवासाठी उत्साहाने गावाकडे आलेल्या चाकरमान्यांचा मोठा वेळ CNG पंपांवरच जात आहे.
कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या नागरिकांना इंधनासाठी होणाऱ्या या प्रतीक्षेमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. CNGचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या गर्दीच्या काळात CNGचा तुटवडा निर्माण झाल्याने ‘गावी कमी आणि CNG पंपावरच जास्त वेळ’ अशी परिस्थिती खेडमध्ये निर्माण झाली आहे.




