इन्स्टाग्रामवरील ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी राजापुरात खळबळ


संशयित अल्पवयीन युवक ताब्यात; व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांचा शोध, लॉज चालकावरही कारवाईची शक्यता


राजापूर : इन्स्टाग्रामवरील ओळखीतून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तसेच या घटनेचे चित्रीकरण करून व्हिडिओ प्रसारित केल्याची धक्कादायक घटना राजापुरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका अल्पवयीन युवकाविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे राजापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षणासाठी राजापूर शहरात येणाऱ्या या अल्पवयीन मुलीची शहरात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलाशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. काही दिवसांच्या परिचयानंतर संबंधित युवकाने तिला आमिष दाखवून १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान कोदवली साईनगर परिसरातील एका लॉजवर नेल्याचा आरोप आहे.

तेथे मुलीवर अत्याचार करून या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर संबंधित व्हिडिओ संशयिताने आपल्या एका मित्राला ‘वन टाइम व्ह्यू’ मोडवर पाठवला. मात्र, त्या मित्राने दुसऱ्या मोबाइलद्वारे व्हिडिओचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून तो अन्य एका मित्राला पाठवल्याचे तपासात समोर आल्याची माहिती आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ अल्पवयीन मुलीच्या चुलत भावापर्यंत पोहोचल्यानंतर त्याने याबाबत तिच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४ तसेच पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांन्वये आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७(बी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडिओ पुढे प्रसारित करणाऱ्या संबंधित व्यक्तींचा पोलीस शोध घेत असून, त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच अल्पवयीन मुलगा-मुलीला प्रवेश देणाऱ्या संबंधित लॉज चालकाचीही चौकशी करण्यात येत असून त्याच्यावर कारवाईची शक्यता आहे.

पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button