
सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा; खेडमध्ये वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई
भारतीय न्यायसंहिता कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल; भरणे ब्रिजखाली, खेड-दापोली मार्गासह विविध ठिकाणी कारवाई
खेड : सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल तसेच वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांविरोधात खेड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. २७ आणि २८ ऑगस्ट २०२६ रोजी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८५ अन्वये अनेक वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२७ ऑगस्ट रोजी सायंकाळी खेड-दापोली जाणाऱ्या रस्त्यावर एका वाहनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याप्रकरणी अमोल अशोक शेलार (वय ४२, रा. आमगे, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २४०/२०२६ दाखल करण्यात आला. त्यानंतर भरणे ब्रिजखाली रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने चारचाकी वाहने उभी केल्याप्रकरणी अनुक्रमे गुन्हे दाखल करण्यात आले.
या कारवाईमध्ये अजित श्रीधर सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून एका टाटा टियागो वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा क्रमांक २४१/२०२६ दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे तुषार नानाजी कदम (वय ४०, रा. कान्हे लक्ष्मीनारायण, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २४२/२०२६ दाखल करण्यात आला. त्यांनी भरणे ब्रिजखाली रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
तसेच भरणे ब्रिजखालीच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अन्य वाहनचालकांविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली. अमर शंकर मोरे (वय ४८, व्यवसाय ग्रामीण पोलीस ठाणे, कारंजापाडी, ता. खेड) यांच्या ताब्यातील मारुती वाहन क्रमांक एम एच- ०८ -ई- २४३८ रस्त्यावर उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कारवाईत निलेश पांडु वीर (वय ३५, रा. करलेणी चुतुरू, ता. खेड) यांच्या ताब्यातील मारुती ईको वाहन क्रमांक एम एच -०८- ए एक्स-३०९२ संदर्भातही गुन्हा दाखल करण्यात आला.
२८ ऑगस्ट रोजी सायंकाळी खेड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बशिर अहमद आदम चौगले (वय ६३, रा. बहिरवली, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २४६/२०२६ दाखल करण्यात आला. त्यांच्या ताब्यातील ईको वाहन क्रमांक एम एच- ०८- ए एक्स-१०२२ रस्त्यावर अशा प्रकारे उभे करण्यात आले होते की, येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
तिनबत्ती नाक्यावरही वाहनचालकाविरुद्ध गुन्हा
खेडकडून दापोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील तिनबत्ती नाका येथेही पोलिसांनी कारवाई केली. सौरभ दत्ताराम चिंचघरकर (वय २६, रा. पालगड, ता. दापोली) यांच्या ताब्यातील एम एच -०४-एम आर-१८१० क्रमांकाचे वाहन रस्त्यावर उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक २४७/२०२६ दाखल करण्यात आला.
सार्वजनिक रस्त्यावर वाहने चुकीच्या पद्धतीने उभी केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याबरोबरच अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी, वळणांवर, मुख्य रस्त्यांवर आणि पादचाऱ्यांची वर्दळ असलेल्या परिसरात अशी वाहने धोकादायक ठरू शकतात.
खेड पोलिसांनी अशा प्रकारे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८५ अंतर्गत कारवाई सुरू केली असून, सार्वजनिक रस्त्यावर वाहने पार्क करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




