
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांचे व बागांचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. २६ ): जिल्ह्यात कमी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) यांनी २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता विशेष साप्ताहिक कृषी सल्ला जारी केला आहे. शेतकऱ्यांनी भात कापणी, रब्बी पिकांची पेरणी, फळबागांची निगा, पशुधन संरक्षण आणि जलसंधारणाबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
१. खरीप भात काढणी व साठवणूक
- कापणी: हळव्या भाताच्या जाती कापणीस तयार झाल्या असून, पावसाचा अंदाज घेऊन कोरड्या हवामानात ‘वैभव विळा’ वापरून जमिनीलगत कापणी करावी. वैभव विळ्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो व पेंढा जास्त मिळतो. हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असल्याने कापलेला भात शेतात जास्त वेळ न ठेवता त्वरित मळणी करून सुरक्षित ठिकाणी वाळवावा.
- साठवणूक: धान्य ६ ते ७ दिवस उन्हात वाळवून त्यातील आर्द्रता सुमारे १० टक्क्यांपर्यंत खाली आणावी. बारदानावर मॅलॅथिऑनची फवारणी करावी. धान्याची पोती जमिनीपासून १-२ फूट उंचावर फळ्यांवर ठेवावीत. सेंद्रिय संरक्षणासाठी कडुनिंबाची पाने किंवा निंबोळी चुरा वापरावा. पतंगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साठवणुकीच्या खोलीत १४ वॅटचा बल्ब व त्याखाली पाण्याने भरलेले उथळ भांडे ठेवावे.
- उशिरा येणाऱ्या जाती: निमगरव्या व गरव्या जातींमध्ये पाण्याचा ताण जाणवत असल्यास १% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. फुलोरा अवस्थेत प्रति गुंठा ४३५ ग्रॅम युरिया ओलावा असताना द्यावा.
२. रब्बी हंगामात कुळीथ व वाल पिकांची पेरणी
भात काढणीनंतर जमिनीत उपलब्ध असलेल्या ओलाव्याचा वापर करून त्वरित कुळीथ व वाल पिकाची पेरणी करावी. - शून्य/विनामशागत पेरणी: पाण्याची टंचाई असलेल्या भागात मशागत न करता, तण नियंत्रणासाठी ग्लायफोसेट (५ मि.ली. प्रति लिटर) फवारून ३० × १५ सें.मी. अंतरावर टोकण पद्धतीने पेरणी करावी. प्रति गुंठा १ किलो दाणेदार मिश्रखत द्यावे.
- बीजप्रक्रिया: कुळीथ व वाल बियाण्यास प्रति किलो २.५ ते ३ ग्रॅम थायरम बुरशीनाशक, त्यानंतर प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करून सावलीत सुकवून पेरणी करावी.
- ओलावा टिकवण्यासाठी उगवणीनंतर १०-१५ दिवसांनी भाताच्या पेंढ्याचे आच्छादन (Mulching) करावे.
३. फळबागा व भाजीपाला पिकांची काळजी - ठिबक सिंचन व आच्छादन: संभाव्य पाणीटंचाई पाहता आंबा, काजू, नारळ, चिकू व सुपारी बागांमध्ये पारंपरिक पद्धतीऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा व झाडांभोवती जैविक कचऱ्याचे आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या लहान रोपांचे प्रखर उन्हापासून शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांद्वारे संरक्षण करावे.
- आंबा बाग: नवीन पालवीवर तुडतुडे नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रिन २.८% EC (९ मि.ली. प्रति १० लिटर पाणी) आणि करपा रोगासाठी कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइडची फवारणी कोरड्या हवामानात करावी. बागेतील गवत काढून स्वच्छता करावी, जेणेकरून मुळांना ताण बसून मोहराची प्रक्रिया सुलभ होईल.
- काजू बाग: नवीन पालवीवरील टी-मॉस्किटो बग (काजूवरील ढेकण्या) व फुलकिडींच्या व्यवस्थापनासाठी लॅम्ब्डा सायहालोथ्रिन ५% (६ मि.ली. प्रति १० लिटर पाणी) फवारावे.
- हळद व भाजीपाला: हळदीला साडेचार महिने झाले असल्यास ८८० ग्रॅम प्रति गुंठा युरिया देऊन मातीची भर लावावी. रब्बी हंगामात मिरची, वांगी व टोमॅटोकरिता ट्रायकोडर्मा प्रक्रिया करून गादी वाफ्यावर रोपवाटिका तयार करावी.
४. चारा टंचाई व पशुधन/कुक्कुटपालन व्यवस्थापन - संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन फुलोरा अवस्थेतील हिरव्या चाऱ्याची गुळ, युरिया व मिठाच्या मिश्रणासह प्रक्रिया करून मुरघास (Silage) बनवावा किंवा सावलीत वाळवून साठवणूक करावी.
- वाढत्या तापमानामुळे जनावरांना व कुक्कुटपालन शेडमध्ये स्वच्छ, ताजे व थंड पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावे. जनावरांना दुपारच्या तीव्र उन्हात चरण्यास सोडू नये.
- वादळी वारे व विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याने पशुधनास गोठ्यात सुरक्षित ठिकाणी बांधावे.
५. जलसंधारणासाठी ‘कोकण विजय बंधारा’ उभारण्याचे आवाहन
आगामी काळात शेती व बागायतीसाठी पाण्याची तीव्र टंचाई भासू नये, यासाठी शेतकऱ्यांनी बागांजवळील ओढे व नाल्यांवर लोकसहभागातून ‘कोकण विजय बंधारा’ (दगडी बंधारा व त्यावर प्लास्टिक आच्छादन) उभारून पाणी अडवावे. यामुळे भूजल पुनर्भरण होण्यास, मातीची धूप थांबण्यास तसेच रब्बी पिके व फवारणीसाठी पाणी उपलब्ध राहण्यास मोठी मदत होईल.
अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांनी जवळचे कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र (KVK) अथवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.




